मुंबई |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फेसबुकवर बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगरमधील एका तरुणावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांक रवींद्र माणगावकर (३९, रा. साई सिध्दी विनायक, उमेशनगर, डोंबिवली पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. शशांकने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करुन शिवसैनिकांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला. तसेच राजकीय गटात द्वेशभावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे डोंबिवलीतील पदाधिकारी संतोष चव्हाण यांनी तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, आरोपी शशांक माणगावकर यांनी शुक्रवारी त्यांच्या फेसबुक पानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात काम करत असतानाच्या छायाचित्रावर मुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी होईल अशा पध्दतीने गाळलेल्या जागा भरा पध्दतीने छायाचित्र ओळ दिली होती. या छायाचित्र आणि त्याखालील ओळीने राजकीय द्वेशभावनेचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. तसेच शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
तसेच शशांकने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी शेरेबाजी करुन त्यांचीही बदनामी केली आहे. संतोष चव्हाण यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांना घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी शशांकची फेसबुक पानावरील लिखाणाची खात्री करुन त्याच्या विरुध्द राजकीय द्वेशभावना पसरविणे, दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक घनश्याम बेंद्रे तपास करत आहेत.
0 Comments