मुंबई |
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस उपनिरीक्षक अनिकेत गुलाबराव शिंदेवर (वय २९ वर्ष) बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या उपनिरीक्षकाने नाशिक येथे आपली सहकारी महिला पोलीस उप निरीक्षकावर हा अतिप्रसंग केला आहे. त्यामुळे पोलीस दलातील महिला कर्मचारी किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ३० वर्षीय पीडित महिलेने काल रबाळे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
आरोपी अनिकेतने २०१९ ते २२ सप्टेंबर दरम्यान अनेकदा बलात्कार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने २०१९ ते सप्टे २०२२ दरम्यान नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणा दरम्यान पीडितेबरोबर प्रेम संबंध प्रस्थापित करून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून नाशिक शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये, तसेच मुंबई, नागपूर व घणसोली घरोंदा येथील पीडितेच्या राहत्या घरी तिच्यासोबत लगट करून जबरदस्तीने शारिरीक तसेच अनैसर्गिक संबंध स्थापन केले.
आरोपी अनिकेत शिंदे हा मुंबई कालिना परिसरातील समतानगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने भादंवि कलम ३७६, ३७६(२), ३७७, ३५४(अ), ३५४ (ड) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0 Comments