मुंबई |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंड करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्यात आज प्रथमच थेट शाब्दिक सामना होणार आहे. मुंबईत आयोजित दोन्ही गटाच्या दुसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर गद्दारीची टीका करण्यात येत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना आज शिंदे गटाकडून गद्दारी केल्याचं मान्य करण्यात आलं आहे.
शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. खैरे म्हणाले की, ते गद्दार आहे. त्यांनी पैसे देऊन लोक आणले. प्रत्येकी १ हजार रुपये दिले. ५२ कोटी रुपये मेळाव्यासाठी खर्च केल्याचा आरोप खैरे यांनी केला. खैरे यांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि प्रतोद भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोगावले म्हणाले की, आम्ही गद्दारी महाराष्ट्रासाठी केली. जनतेवर अन्याय होत होता. त्यासाठी आम्ही उठाव केला. त्याला ते गद्दारी बोलतात. चांगली गोष्ट आहे. याआधी इतिहासात अनेक उठाव झाल्याची आठवण गोगावले यांनी करून दिली. शिंदे आणि ठाकरे गटांनी मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र मेळाव्याचे यश भाषणांवरच ठरणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे कधीकाळी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठायचा. त्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. आता उद्धव ठाकरे देखील ठाकरी बाण्याने भाषण करताना दिसतात. आता शिंदे यांना देखील जबरदस्त भाषण करावं लागणार हे स्पष्टच आहे.
0 Comments