'हा' प्रकल्प भरला; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा


वैराग |

जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या अधिग्रहण क्षेत्रामध्ये आणि आसपासच्या गावांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यामध्ये वाढ झाली असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, त्यामुळे नागझरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून ठीक ठिकाणी असलेले पूल पाण्याखाली येत आहेत त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 नागझरी नदीवर उभारण्यात आलेला बार्शी तालुक्यातील महत्त्वाचा मध्यम प्रकल्प म्हणून जवळगाव मध्यम प्रकल्पाकडे पाहिले जाते. ह्या वर्षी जवळगाव मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन महिन्यापूर्वीच भरून सांडव्यातून वाहू लागला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जवळगाव, गौडगाव परिसरासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पडलेल्या पावसाचे पाणी जवळगाव मध्यम प्रकल्पात येत असल्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जोरदार पाऊस पडल्यामुळे सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. परिणामी नागझरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे अंबाबाईची वाडी आणि जोतिबाची वाडी या दोन्ही गावांचा एकमेकांशी असणारा संपर्क तुटला आहे. धरणाखाली पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागल्यामुळे हत्तीज,धामणगाव, राळेरास ,सासुरे आदी नदी कडेला असणाऱ्या गावांना सतर्क राहण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments