सोलापूर ! ऑटोरिक्षातून 400 लिटर हातभट्टी दारु जप्त


सोलापूर/प्रतिनिधी :

दारूबंदी सप्ताहाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत 7 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात एका ऑटोरिक्षातून 400 लिटर व मोटरसायकलीवरुन 160 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करताना गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दारूबंदी सप्ताह राबविण्यात येत असून त्यानिमित्त जिल्हाभरात विशेष मोहीम राबविली जात असून अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अ 1 विभाग  पुष्पराज देशमुख यांनी जवान चेतन व्हनगुंटी यांचेसह सिद्धार्थ चौक येथे पाळत ठेवली असता एका ऑटोरिक्षा क्रमांक MH 13 G 7734 मधून 400 लिटर हातभट्टी दारु जप्त केली असून आरोपी इसम जितेश देवसिंग तारवाले, वय 36 वर्षे, रा. उत्तर सदर बाजार याचेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचे ताब्यातून 20 हजार 400 रुपये किंमतीच्या हातभट्टी दारुसह एकूण 1 लाख 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

एका अन्य कारवाईत उषाकिरण मिसाळ दुय्यम निरीक्षक अ 2 विभाग व जवान शोएब बेगमपुरे यांना सकाळी 7.30 च्या सुमारास निलम नगर येथील लक्ष्मीनारायण टॉकीज समोरील रोडवर एका दुचाकीवरून हातभट्टी दारूची वाहतूक होताना आढळून आल्याने राजू बाबू चव्हाण, वय 41 वर्षे, रा. मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) याचेविरुद्ध गुन्हा नोंदविला असून  टीव्हीएस ऍक्सेस स्कूटी क्रमांक MH13 DP 2106 सह 160 लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून एकूण 78 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही कारवाया राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे , दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ , पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम  निरीक्षक बिराजदार,  जवान चेतन व्हनगुंटी,  प्रियंका कुटे, शोएब बेगमपुरे व वाहन चालक संजय नवले व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments