शिवसेनेतून बंडाची अनेक कारणे आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांनी दिलेली आहेत. यामध्ये मुख्य कारण होते ते निधीचा तुटवडा मुख्यमंत्री पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतानाही शिवसेना आमदारांना तुटपूंजा निधी आणि राष्ट्रवादी आमदारांना मात्र, भरघोस निधीवाटप केला जात असल्याचे शहाजी बापू पाटलांनी अनेक वेळा सांगितले आहे. शिंदे सरकारने अवघ्या दोन महिन्याच्या काळात 300 कोटीचा निधी मंजूर केल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनीच सांगितले आहे. मविआ सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवारांच्या पाया पडूनही निधी मिळाला नसल्याचे त्यांचे फोन कॉलमधील वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळे ज्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला तो साध्य झाला अशीच त्यांची भावना होती.
काय होते शहाजीबापूंचे आरोप?
महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षप्रमुखांकडे मुख्यमंत्री पद असताना आम्हालाच दुय्यम वागणूक दिली जात होती. राष्ट्रवादीच्या आमदाराप्रमाणेही आम्हाला निधी दिला जात नव्हता. मविआ सरकारच्या काळात खऱ्या अर्थाने आमचीच घुसमट झाल्याचे शहाजीबापू पाटलांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे मतदारांना काय सांगावे हा प्रश्न असल्याचेही ते वारंवार म्हणत होते.
उपसा सिंचनासाठी निधी
सांगोला तालुक्यातील शिरभावी उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. ही योजना पूर्ण करण्यासाठी 300 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्षात कामालाही सुरवात होणार आहे. त्यामुळे अनेक गावातील पाणी समस्या मिटणार आहे.
81 गावांना पाणीपुरवठा
शिरभावी उपसा सिंचन योजनेतून 81 गावांना पाणीपुरवठा होणार आहे. ही योजना 1997 सालीच मंजूर झाली होती. मात्र, डागडुजीचे काम रखडले होते. याकरिता अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला होता. पण याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले होते. आता शिंदे सरकारच्या काळात हा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास पाटील यांना आहे.
15 दिवसांमध्ये कामाला सुरवात
300 कोटीपैकी सिव्हिल वर्कसाठी 90 कोटीचे टेंडर आता पंधरा दिवसात निघणार आहे. तर 165 कोटी रुपयांची पाईपलाईन साठी असणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली योजना आता पूर्णत्वास जाणार आहे. शिवाय योजनेचा जो उद्देश होता तो आता खऱ्या अर्थाने साध्य होणार आहे. सांगोला तालुक्यातील वाड्या वस्त्यावरील माझ्या जनतेला भीमा नदीवरुन शुध्द पाणी प्यायला मिळणार आहे.
0 Comments