कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. "संपूर्ण प्रकरणात विहित प्रक्रियेचे पालन केले जाईल. वैद्यकीय चाचणी व तपासणी प्रक्रिया नियमानुसार होईल. त्यानंतर शिवमूर्ती यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येईल अशी माहिती कर्नाटकचे एडीजीपी आलोक कुमार यांनी दिली आहे.
पोलिसांनी महंत आणि इतर चार जणांविरुद्ध पोक्सो (POCSO), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत यांना अटक करण्यात आली आहे. शरनारू हे राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे महंत आहेत. जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत त्याच शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, गुरुवारी चित्रदुर्गाच्या न्यायालयाने सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. यापूर्वीही त्यांला अटक करण्यात आली आहे.
मठाचे प्रशासकीय अधिकारी एस. के. बसवराजन यांनी सांगितले की, महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्याविरोधातील कोणत्याही कटात त्यांचा सहभाग नव्हता आणि त्यांनी मुलांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करून आपले कर्तव्य बजावले आहे.
मठ अधिकाऱ्यांनी माजी आमदार बसवराजन आणि त्यांच्या पत्नीवर महंतांविरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच बसवराजन यांनी मौन सोडले आणि येत्या काही दिवसांत सर्वांना सर्व काही कळेल व मुलींची तक्रार योग्य असेल तर त्यांना न्याय मिळेल असे सांगितले.
दरम्यान, बसवराजन आणि त्यांच्या पत्नीला लैंगिक अत्याचार आणि अपहरणाच्या एका प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली असून तक्रारदार मठातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसवराजन म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या पत्नीविरुद्धचा खटला “पूर्णपणे खोटा” असल्याचे म्हटले आहे.
0 Comments