पंतप्रधानांना राजकारणातील घराणेशाही संपवायची आहे



माणसाला फक्त पुस्तकातून बुद्धिवान होता येत नाही, त्यासाठी पुस्तकातून शिकताना जे प्रत्यक्ष अनुभवले जाते ते खरे शिक्षण आहे. मात्र बुद्धिजीवी समजताना अहंकार नसावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातील वंशवाद संपवायचा आहे. मी देखील त्याचे प्रतीक आहे असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. २६) 'संवाद बुद्धिवंतांशी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर होते. खासदार प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पंकजा मुंडे म्हणाल्या, बुद्धिवान व बुद्धिजीवी यात फरक आहे.

शिक्षणात अनेकदा नापास झालेल्यांना बुद्धी नसते असे नाही, कारण शिक्षणात असे मागे असणारेही खूप मोठमोठ्या पदावर व उद्योजक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धिमत्ता होती. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धी व शूरपणाने स्वराज्य उभे केले. हे सांगताना त्यांनी राजकारणाचा संदर्भ देत, अल्पशिक्षण असलेल्या व्यक्तीही राजकारणात मुख्य पदावर राहिलेल्या आहेत असे सांगितले. या कार्यक्रमात वैद्यकीयची नीट परीक्षा व सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नमिता मुंदडा यांनी मतदारसंघातील केलेल्या कामांची माहिती दिली. अक्षय मुंदडा व बिपीन क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक राम कुलकर्णी तर सूत्रसंचालन डॉ. अतुल देशपांडे व डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केले.

राजकारणावर भाष्य
हा कार्यक्रम राजकारणविरहित असल्याने बरे वाटले. मात्र यापुढे निवडणूक लढताना काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेनुसार देशाला काहीतरी आपण दिले पाहिजे यासाठी काहीतरी देता येईल, यासाठी राजकारणात काम करायचे आहे. पंतप्रधान मोदी यांना राजकारणातील वंशवाद संपवायचा आहे. मी देखील त्याचे प्रतीक असे देखील त्या म्हणाल्या. दरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. आगामी काळात पंकजा मुंडे या पुन्हा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होतील, असा आशावाद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments