सुनबाई निघाल्या काॅलेजला!


गेल्यावर्षी चार एप्रिलला चिरंजीवाने त्याच्या मनाने लग्न केले आणि मला मोठा शाॅक बसला. आता आयुष्यभर त्याचे तोंड पाहायचे नाही अशी मी भीष्मप्रतिज्ञा केली. पण ती फारतर दोन महिन्यांपर्यंत टिकली .सूनबाईने कोणाच्यातरी फोनवरुन मला फोन केला आणि माझ्यातलाच 'बाप 'जागा झाला. आपली गृहलक्ष्मी आपल्या घरी असावी असे मला सारखे वाटायला लागले. कोण काय म्हणेल यापेक्षा सासवासुनांचे कसे पटणार हा माझ्यासमोर यक्षप्रश्न होता. कारण आमच्या मॅडमचा स्वभाव अतिशय कडक.. खोटे अगदी वर्ज्य! 

एकेदिवशी मी माझ्या मनातले तिच्याशी बोललो. तिलाही ते पटले आणि कायदेशीर सोपस्कार पार पाडून आम्ही सुनबाईला घेऊन घरी आलो !दरम्यान अभ्यर्थना ही हसरी परी नात म्हणून जन्माला आली आणि मी आजोबा झालो!

सुनबाई तशी लहानपणापासूनच परिचयाची होती. पण दहावीनंतर तिला शिकता आले नव्हते. चिरंजीव केमिकल इंजिनिअर! सुनबाई दहावी झालेली !पुढे जाऊन यांचा संसार अनबॅलन्स होणार हे दिसत होते. असा संसार लवकर बिघडतो !रशिया आणि अमेरिका यांची तुल्यबळ शक्ती असल्यामुळे निदान आजवरतरी तिसरे महायुद्ध झाले नाही! तसेच संसाराचेही आहे! सुनबाईचे अस्तित्वच नाही तर तिचा स्वाभिमानही जपणे मला आवश्यक वाटले .पुन्हा मी आमच्या मॅडमशी बोललो! कारण संसारात 'संवाद 'अतिशय आवश्यक आहे! तिनेही होकार दिला पण लहानग्या बाळाच्या संगोपनाचा प्रश्न होता .कारण आमचा धंदा गवंडीकाम! काम करुन बाळाला सांभाळणे कठीणच होते पण तिने ते आव्हान पेलायचे ठरवले आणि बाळही तिच्याकडे राहायला लागले! 

झाले! नजिकच्या तळदेवच्या काॅलेजला मी सुनबाई 'अदीती 'हिचे अकरावी आर्ट चे अॅडमिशन घेतले !युनिफॉर्म आमच्या मॅडमनी शिवला .वाईला जाऊन लागणारे शैक्षणिक साहित्य घेऊन आलो आणि सुनबाई काॅलेजला जाऊ लागली! 
गेल्या आठवड्यात डाॅक्टरांनी मला डायबेटीस झाल्याचे निदान केले आणि नाही म्हटले तरी मी घाबरलोच! सुनबाईला कुठवर शिकवायचे याबद्दल माझी स्वप्न अगदी क्लियर आहेत पण परमेश्वराने मला तोपर्यंत जगावयाला हवे इतकेच! 

- अंकुश मोहिते, सातारा
(मजकूर आणि छायाचित्रे अंकुश मोहिते यांच्या फेसबुकवरून साभार)

Post a Comment

0 Comments