भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींनी पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार
अनुभवला. आशिया चषकातील दुसरा सामना रविवारी (28 ऑगस्ट) रोजी भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यात पार पडला. आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि त्यानंतर पाकिस्तानच्या 148 धावांचे आव्हान भारताच्या फलंदाजांनी नियोजनात्मक खेळी करत लिलया पार केले. यासह टी-20 विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाने पाकिस्तानला आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात पराभूत केले आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सामन्यात सुरुवातीला भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला अवघ्या 147 धावांत रोखले. भुवनेश्वर कुमारने घेतलेले महत्वपूर्ण 4 बळी आणि हार्दिक पांड्याचे 3 बळी या जोरावर पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या दोघांना आवेश खान (1) आणि अर्शदीप सिंग (2) यांनी उत्तम साथ दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान 43 आणि इफ्तिकार अहमद याच्या 28 धावांव्यतिरिक्त कुणालाही आश्वासक धावसंख्या उभारता आली नाही.
त्यामुळे पाकिस्तानचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 147 अशा
स्थितीत संपला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने नियोजनात्मक आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. भारताच्या सलामीवीरांपैकी केएल राहुल शुन्यावरच बाद झाला. परंतू त्यानंतर प्रत्येक फलंदाजांनी भागीदारी रचत संघाचा विजय सोपा केला. शंभरावी टी20 खेळणाऱ्या विराट कोहलीने 35 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. त्याशिवाय रोहित (12), सुर्यकुमार यादव (18), रविंद्र जडेजा (35), हार्दिक पांड्या (33) यांनी भारताचा विजय सोपा केला.
0 Comments