फडणवीस दिल्लीला, राज्यपाल मुंबईत आले, शिंदेंनीही आमदारांना बोलावलं, मंत्रिमंडळ विस्तार उद्याच?


महाराष्ट्र सरकारच्या भवितव्याबाबत सुप्रीम कोर्टात  दोन दिवस सुनावणी झाली, यानंतर आता पुढची सुनावणी सोमवारी 8 तारखेला होणार आहे. सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये फडणवीस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत  चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे फडणवीस दिल्लीला गेलेले असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबईत आल्याची माहिती आहे.

राज्यपाल आज नागपुरात होते. नागपूरहूनच त्यांचा दिल्लीचा नियोजित दौरा होता, पण या दौऱ्यात बदल झाला आहे. एका दिवसासाठी राज्यपाल मुंबईत आले आहेत. यानंतर 6-7 ऑगस्टला राज्यपाल पुन्हा दिल्लीला जातील.

एकनाथ शिंदे  यांनीही उद्याच त्यांच्यासोबत असलेल्या 50 आमदारांची बैठक बोलावली आहे. या सगळ्या घडामोडी बघता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार का? देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या नावाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

केसरकरांचे संकेत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, तेव्हाच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, ती माहिती मी देतो. मी कुठलाही निर्णय घेत नाही, त्याच धर्तीवर चार दिवसांमध्ये विस्तार होईल, असं सांगितल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले. ज्या अर्थी दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत, त्याअर्थी यादी फायनल झाल्याचं म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळात कोणाला संधी? मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments