वैराग / प्रतिनिधी :
अख्खं घर दुःखात बुडालं होतं. घरातला प्रत्येक सदस्य शोक मग्न होता. मुलांसाठी मायेची सावली असणारी आई, तर नातवांच्या लाडक्या आज्जीचं निधन झालं होतं. पण याच वेळी घरातल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देवून सर्वांनी घरावर ध्वजारोहण करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पाडला. दौलतबी बाबामियाँ मुलाणी (वय 82, रा.धामणगाव ता.बार्शी) यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच मुलाणी (सय्यद) कुटुंबाला दौलतबी यांच्या जाण्याचे दु:ख झाले. धामणगावचे मुलाणी परिवार मोठा. दौलतबी यांना पाच मुलं व दोन मुली. नातवंडे ही वेगळीच. आपल्या आई-आज्जीच्या जाण्याने सर्व जण एकत्र जमली. दौलतबी यांना अखेरचा निरोप देत जड पावलांनी सर्व जण घरी परतले. पण घरातला शोक काही शांत होत नव्हता. ओल्या डोळ्यांनीच सर्वांची रात्र सरली. उजाडला नवा दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा. दु:खाला बाजूला ठेवत दौलतबी यांच्या मुलांनी व नातवांडांनी ध्वजारोहण करण्याचे ठरवले. दोन दिवसा पुर्वीच घरात आणुन ठेवलेला राष्ट्रध्वज बाहेर काढण्यात आला. शोक दुर सारत सर्वांनी हा ध्वज शोकाने चिंब झालेल्या घराच्या भिंतीवर उभा केला. सर्वांनी ध्वजाला सलामी दिली. दु:खाला विसरुन आपल्या देशाप्रती असणारे प्रेम मुलाणी कुटुंबाने यावेळी व्यक्त केले. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतानाच मुलाणी कुटुंबीयांची ही कृती अनोखी व कौतुकास्पद ठरली आहे.
0 Comments