बाजारभोगाव परिसरातील 500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
बाजारभोगाव(६) : शैक्षणिक जडणघडण होताना प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत असून 21 व्या शतकात शाळांचे डिजीटलाझेंशन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पश्चिम पन्हाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असून शिक्षणासाठी वाटेल ती मदत करण्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. कालकथित श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी आणि कालकथित अमोल गुंडा माळवी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बाजार भोगाव परिसरातील प्राथमिक शाळेत मोफत वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
पन्हाळा तालुक्यातील वाळोली गावचे सुपुत्र ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मातोश्री कालकथित श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी आणि पुतणे कालकथित अमोल गुंडा माळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत वह्या वाटप कार्यक्रम आज प्राथमिक शाळा वाळोली, बाजार भोगाव, पोहाळे, तसेच साळवाडी येथे संपन्न झाला. यावेळी युवा नेते राजवीर अजित नरके, पंचायत समिती सदस्य पी. डी. पाटील, रवी चौगुले, सरपंच शोभाताई पाटील, सरपंच माया नितीन पाटील, सरपंच रेखा सुरेश पाटील, माजी जि. प सदस्य श्री. तेली, प्रा.अशोक पाटील, श्री. चोपदार, रघुनाथ पाटील, श्रीधर चोपदार, अभिजीत कोतोलीकर, आनंद दिवाण, शाळेचे मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आपल्या बालपणीच्या व आईच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले " आईने आमच्या शिकणासाठी अपार कष्ट घेतले असून दुस-याच्या घरी शेण काढणे, धुणी-भांडी काढणे, तर कधी शेतावर मजुरी करून आम्हाला घडवलं म्हणूनच आज यशाच्या या शिखरापर्यत पोहचलो. जुन्या वहीची पाने शिउन शिकावं लागत होतं त्यावेळेची परिस्थिती अत्यंत बिकट होती, पण या परिसरातील माझ्या लहान भावंडाना, समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात मदत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये विद्यामंदीर वाळोली, विद्यामंदीर पोहाळे, प्राथमिक शाळा, साळवाडी, आणि प्राथमिक शाळा, बाजार भोगाव, ता. पन्हाळा या शाळेतील 500 विद्यार्थ्यांना जवळपास 2000 मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.
दरम्यान कालकथित श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी यांच्या नावाने ट्रस्ट सुरू करून स्वयंपरिपुर्ण शैक्षणिकसंकुल उभे करण्यात येणार असल्याचे सांगतानाच लवकर या परिसरात दोन अत्याधुनिक अंबुलन्स सुरू करण्यात येणार आहे. काही तांत्रिक बाबी दूर झाल्यावर लवकर त्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या परिसरात शाळांच्या दुरुस्ती, स्पर्धा परीक्षा केंद्र, शाळांचे डिजीटलाझेंशन तसेच इतर शैक्षणिक कार्यासाठी पडेल ती मदत स्वतः तसेच शासन स्तरावर करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी प्रा.अशोक पाटील यांनी देखील बालपणीच्या आठवणी सांगत शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
0 Comments