कोल्हापुरचे क्रांतिकारक महादेवराव सुतारांनी वयाच्या 24 वर्षी या भुमीसाठी अर्पण केले प्राण...!


 ✍️ शब्दांकन : धनराज आमते आणि अनिल सुतार (गंगापूर) संकल्पना : अर्जुन पाटील 

आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास अनेक क्रांतिवीरांच्या पराक्रमाने, बलिदानाने लिहिला गेलेला आहे. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती हसत हसत दिली. त्या सर्व क्रांतिकारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. 15 ऑगस्ट 2022 यावर्षी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आज आपण संपूर्ण जगभरात स्वातंत्र्यांन एक भारतीय म्हणून वावरत आहे. हा स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ आणण्यासाठी कित्येक वीरांनी 
आपले जीवन या भारत मातेसाठी अर्पण केले. त्यातीलच एक भारत मातेचा वीर पुत्र आमच्या गावी जन्मले ते म्हणजे 'थोर क्रांतिकारक महादेव सखाराम सुतार.' त्यांचा जन्म 1917 साली झाला. तो काळ इंग्रज राजवटीचा होता. आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत जखडलेला होता. ही गुलामगिरी उलथवून टाकण्यासाठी  कित्येक वीरांनी आपले प्राण खर्ची घातले. महादेवराव ही तसेच अगदी लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्ती होती. ही गुलामगिरी आपल्याला मान्य नाही. हा देश माझा आहे, आणि माझ्या देशामध्ये इतरांनी येऊन राज्य करणे आणि ते राज्य आपण खपवून घेणे म्हणजे, आम्ही काय षंड आहोत का? हा विचार त्यांना शांत बसू देत नव्हता.
      
इंग्रजांना धडा शिकवलाच पाहिजे यासाठी महादेवराव व त्यांचे सहकारी पुंडलिक गोपाळ देसाई (म्हसवे) काका गोपाळ देसाई (म्हसवे) आणि ईश्वरा आप्पा पाटील (कुरली) बेनाडेकर या सहकाऱ्यांनी कित्येक क्रांतिकारी कारवाया केल्या. यामुळे इंग्रजांच्या नाकी दम आणून सोडला. या सर्वांमुळे महादेवराव सुतार आणि त्यांचे सहकारी यांच्या मागावर ईंग्रज होते. 1942 साली महादेवराव सुतार आणि त्यांचे सहकारी अशाच एका मोहिमेवर गेले होते. ती मोहीम म्हणजे मुंबई बेंगलोर ट्रंकलाईन (तार यंत्रणा ) बंद करण्याची. ठिकाण होते मलया डोंगर. दिवस ठरला वेळ ठरली. हे चौघेजण मोहीम फत्ते करण्याच्या इराद्याने गेले. परंतु इंग्रज आधीपासूनच मागावर असल्या कारणामुळे त्यांना या मोहिमेचा सुगावा लागला. मलया शेजारी झालेल्या चकमकीमध्ये महादेवराव सुतार यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी आपले प्राण या मातृभूमीसाठी दान केले. ज्या वयामध्ये तारुण्याची गुलाबी स्वप्न पडतात त्या वयामध्ये क्रांतिकारी विचाराचे वादळ या तरुणाच्या हृदयात घोंगावत होते. घरी गणपतराव, दादू, बचाराम, अण्णाप्पा, पांडू, धनाजी आणि दोन बहिणी ह्या भावंडामध्ये महादेवराव हे थोरले.
        
या सर्वांची जबाबदारी महादेवराव यांच्यावर होती. घरच्या जबाबदारीचे ओझे सांभाळण्याबरोबरच त्यांना देशाची जबाबदारी महत्वाची वाटत असे. यावर्षी महादेव सुतार यांना जाऊन 80 वर्षी झाली पण आजही हा योद्धा प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये जिवंत आहे. महादेवराव हे आमच्या गावी जन्मले यांचा आम्हास सार्थ अभिमान आहे. गंगापूरची माती या क्रांतिकराच्या रक्ताने पुण्यवान झाली. महादेवराव सुतार यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांचे स्मारक मोठ्य अभिमानाने आपल्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या दारात मोठ्या दिमाखात स्थापन करण्यात आले. महादेवराव यांच्या स्मारकाची सेवा त्यांचे पुतणे मारुती अण्णापा सुतार व ग्राम पंचायत गंगापूर हे अविरत करत आहेत.

Post a Comment

0 Comments