छत्रपती संभाजीराजेंच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना हटके शुभेच्छा!



एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर राज्यात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तर काल गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांचे शुभेच्छा देणारे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना यांना शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण त्याच बरोबर मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

काय आहे ट्विट ?

महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासह मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावाल, ही अपेक्षा ! असे ट्विट करीत संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नाची आठवण करून दिली आहे.

तर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासह मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावाल, ही अपेक्षा ! ” असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. यासोबत त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला फोटोही ट्विट केला आहे. यात एकनाथ शिंदे संभाजी राजेंच्या सोबत चर्चा करताना दिसत आहेत.

दरम्यान , छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता अनेकदा आंदोलनं केली आहेत. ते स्वतः देखील उपोषणाला बसले होते. आता मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे त्यांनी नव्या सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र नवे सरकार हे प्रश्न मार्गी लावणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


 


Post a Comment

0 Comments