लेखक - पैलवान धनराज शेखर भोसले, राष्ट्रीय मल्ल, पंढरपूर.
परवा पुण्यात जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांची भेट झाली. ओळख निघाल्यावर मी सोलापूरचा आहे म्हणल्यावर त्यांनी सिकंदर शेखचा व माऊली जमदाडे यांचा गाववाला म्हणून कौतुक केले. मग जाणीव झाली की केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा व पंजाबच नव्हे तर संबंध भारतातील जनता पैलवानांवर किती प्रेम करते.
आज सिकंदरला सर्व पंजाब डोक्यावर घेत आहे तर पंजाबचा जस्सा पट्टीला महाराष्ट्रातील घरांमध्ये ओवाळले जाते, त्याला भेटण्यासाठी झुंबड उडते.
पैलवानकी ही अशी गोष्ट आहे की जी टॉपच्या पैलवानला ओळख देतेच व बरोबर आयुष्यभराची भाकरी पण. पण याचबरोबर मध्यम व खालच्या जोडीतील व ज्यांनी उमेदीच्या कष्ट उपसले पण तितके नाव करता नाही आले, अशा पैलवानांनादेखील आयुष्यभराची 'पैलवान' ही ओळख देते. यचबरोबर मिळतात गावोगावचे सोबती, ओळखी-पाळखी व संबंध, की जे आयुष्यभर पैलवानला तरून नेतात. म्हणूनच फक्त मेडल आणणारे व गदा जिंकणारेच पैलवान आयुष्यात यशस्वी होतात असे नाही तर मैदानात दंड ठोकून भिडायचे साहस करणारे प्रत्येक जण हा यशस्वीतेकेडे वाटचाल करतो.
पैलवानांवर असणारे लोकप्रेम हेच यामागचे मूळ कारण आहे. जे प्रेम कुस्ती खेळाला समान्यजनांकडून मिळते ते इतर खेळांना नाही, हे सत्य आहे. पैलवानांचा देखील जनामानसाप्रती असणारे आदर व सामान्य जनतेच्या प्रेमाची असणारी भूक ही जगातील सर्वच देशात सारखी आहे.
याच भावनांना 5 वेळा अमेरिकेचा 74 किलो कुस्तीतील जगज्जेता, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पैलवान जॉर्डन बुरोग्ज यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे व्यक्त केले आहे, तो लिहितो, "मला नेहमीच सर्वात सर्वांसाठी उपलब्ध असणारा पैलवान म्हणून राहणे आवडते- एक असा की जोय इतर पैलवानांपेक्षा, स्पर्धेपेक्षा खूप वर असेल पण त्याचवेळी सामान्यपणे माणसात असेल.
मी माझे इतर आयुष्य खूप खाजगीपणाने घालवणे पसंत करतो. कुस्ती स्पर्धेबाहेर दैनंदिन आयुष्यात मला कमी जणांकडून ओळखला जातो.
ते शांततापूर्ण व समाधानकारक असते.
पण विश्वास बसो अथवा नाही बसो, पैलवान व कुस्ती शौकिनांमध्ये मिसळणे देखील माझ्यासाठी तितकेच समाधानकारक आहे. कारण हे सर्व माझे माणसं आहेत.
मला नेहमी प्रश्न विचारला जातो, "असं सतत पैलवानांमध्ये फोटो, भेटी, घेरून असण्याचा कंटाळा येत नाही का"
माझे उत्तर असते- "अजिबात नाही!"
मला दिवसभर कोणीही न ओळखता दिवस जाण्यापेक्षा दिवसभर फोटोसाठी पोज देऊन व हसून दुखणारे हात व थकलेला चेहरा चालेल. मी आयुष्यभर सर्वोत्तम पैलवान होण्यासाठी झटलो आहे, आणि या सर्वाचे फळ केवळ शोकेसमध्ये ठेवलेले फोटो व ट्रॉफी नाहीत. तर खर बक्षीस हे लोकांमध्ये मिळते, त्यांच्या हृद्यपूर्वक शुभेच्छा, प्रेमाचे बोलणे व चेहऱ्यावरील आनंदवरून दिसते. खर बक्षिस हे लांब अशा बक्षिसांच्या यादीत नसून, मला भेटण्यासाठी व हात मिळवण्यासाठी थांबलेल्या लांब अशा पैलवानांच्या, पालकांच्या व कुस्ती प्रेमींच्या रांगांमध्ये आहे.
हे खरं माझे सोने आहे, सोन्याचे पदक आहे."
अशा प्रकारे केवळ खेळातील मिळणारी हार-जीत ही पैलवानांच्या कुस्तीमधून मिळणाऱ्या मिळकतीचे योग्य मोजमाप नसून आयुष्यभराचा मिळणार सन्मान, प्रतिष्ठा, नातेसंबंध या सर्वच गोष्टी पैलवानांना कुस्तीमुळे प्राप्त होतात. म्हणून वैयक्तिक व सामाजिक यशस्वीतेकडे वाटचाल करण्यासाठीही पैलवान होणे व कुस्ती वाढवणे हे गरजेचे आहे.
0 Comments