सोलापूर जिल्ह्यात ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीचा निर्णय तब्बल दहा वर्षांनंतर झाला आहे. आता पहिल्या दीड किलो मीटरसाठी २३ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी प्रवाशांना १५ रुपये मोजावे लागतील. सोमवारपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. २०१२ मध्ये रिक्षांचे भाडे वाढवले होते. त्यावेळी ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर डिझेलचा दर होता. सध्या डिझेल १०० रुपयांवर गेले आहे.
पेट्रोल व सीएनजी गॅसची दरवाढ, रिक्षांचा वाढलेला विमा हप्ता, मोटार वाहन करातील वाढ अशा विविध अडचणी असतानाही रिक्षाचालक जुन्याच पध्दतीने भाडे घेऊन प्रवाशांना सेवा देत होते. अनेक वर्षांपासून रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्याला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी मान्यता दिली.
महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते सकाळी ५ यावेळेत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारणीस परवानगी. महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागांतील रिक्षांना रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत ४० टक्के भाडे आकारणीस मान्यता. रिक्षातील प्रवाशांसोबत असलेल्या मोठ्या आकाराच्या साहित्याला द्यावे लागणार पाच रुपयांचे शुल्क. ९० दिवसांच्या मुदतीत मीटर प्रमाणीकरण न करणार्या रिक्षांना ही भाडेवाढ लागू राहणार नाही.
0 Comments