'या' ठाकरेंनी दिला शिंदे गटाला पाठिंबा



उद्धव ठाकरे  यांचे मोठे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. आपण राजकारणात सक्रिय होत नसून, केवळ आपल्या पक्षातील नेते मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निहार ठाकरे यांनी सांगितले. मात्र, हे सांगत असताना निहार ठाकरे यांनी आवर्जून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जो पुढे घेऊन जात आहे, तीच खरी शिवसेना असा चिमटाही उद्धव ठाकरे यांना निहार यांनी काढला आहे.

तसेच आपण राजकारणात सक्रिय होत नाही. मात्र, आपण एक वकील आहोत. तसेच कायदेशीर सल्ला देणार फर्म आपण चालवतो. म्हणून कायदेशीर सल्ल्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागली तर, आपण वेळोवेळी नक्कीच ती त्यांना देऊ असेही निहार ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दोन दिवसापूर्वी स्मिता ठाकरे यांनी देखील मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील दोन सदस्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.

Post a Comment

0 Comments