इंटरनेटमुळे सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सोशल माध्यमावरून फसवणुकीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने केलेले कारनामे ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या आरोपी तरुणाने आतापर्यंत २२ महिलांसोबत धक्कादायक कृत्य केलंय.
आरोपी तरुणाने शहरातील तब्बल २४ हून अधिक महिलांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा गैरवापर केला. आरोपीने महिलांच्या इन्स्टाग्रावरून त्यांचे फोटो काढून आधी पॉर्न क्लिप बनवली. त्यानंतर ती व्हायरल करण्याची धमकी देत महिलांकडे पैशांची मागणी केली. आरोपीची महिलांकडून पैसे उकळण्याची पद्धत अशी होती की, पैसे तातडीने दिल्यास ५०० रुपये आणि एक दिवस उशीर झाला तर १००० रुपये घ्यायचा.
दरम्यान, याप्रकरणात काही महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रशांत आदित्य (वय १९) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याला गुजरातमधील गांधीनगरमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य त्याच्या समाजातील महिलांनाच टार्गेट करत होता. दरम्यान, आरोपीच्या या कृत्यामुळे म्हणजेच अश्लील क्लिप पाठवल्या जात असल्याने काही महिलांनी पोलिसांत धाव घेतली.
आरोपीने पाठवलेल्या क्लिप ३० सेकंदाच्या होत्या असंही पीडित महिलांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी अंतर्गत महिलेचा विनयभंग, लैंगिक छळ, खंडणी इत्यादी प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
0 Comments