वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील रवळगाव ग्रामपंचायत मध्ये हा प्रकार उघडकीला आल्याने गावात खळबळ उडाली आहे, गावातील देवस्थान ट्रस्टची परवानगी मिळवताना वापरलेले ना हरकत प्रमाणपत्र बनावट असल्याचे चौकशी नंतर उघड झाल्याने तत्कालीन ग्रामसेवकाने माजी ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
रऊळगाव येथे असलेल्या बालाजी देवस्थानचे माजी ग्रा पं सदस्य भरत शहाजी वाघमोडे यांनी बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट स्थापन केले. मात्र ह्या ट्रस्टसाठी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेले ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र बनावट असल्या बाबतची तक्रार बार्शी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. बार्शी पंचायत समितीने तत्कालीन ग्रामसेवक विश्वनाथ दत्तात्रय माहोरे यांना याबाबत विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. ग्रामसेवक विश्वनाथ दत्तात्रय माहोरे हे ६ जून २०१५ ते ७ मार्च २०२० या कालावधीमध्ये रऊळगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी यातील ग्रामपंचायत सदस्य भरत शहाजी वाघमोडे यांनी बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे १ ऑगस्ट २०१६ रोजीचे ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचा शिक्का मारून ग्रामसेवकाची खोटी सही करून तयार केले.
सदरचा दाखला ग्रामसभा किंवा मासिक सभेच्या ठरावात घेतलेला नाही किंवा त्याची दप्तरही नोंद न घेता भरत वाघमोडे यांनी ग्रामसेवकाच्या खोटा सहीचा दाखला तयार करून तो खरा असल्याचे भासवून धर्मादाय आयुक्त, सोलापूर यांच्याकडे सादर करीत ट्रस्टची स्थापना मिळवली. खोटे दस्तऐवज जमा करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये ग्रामसेवक विश्वनाथ दत्तात्रय माहोरे यांच्या तक्रारीनुसार तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य भरत शहाजी वाघमोडे यांच्यावर भादवी कलम ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments