मुलीच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेने अस्वस्थ झालेल्या आई-वडिलांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुलीच्या मृत्यूमुळे आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. करण हेगडे , (वय 28) आणि शीतल हेगडे (वय 22) असं या माता-पित्यांचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी हेगडे दाम्पत्याची 2 वर्षांच्या मुलीच्या घशात खाऊचा पदार्थ अडकला होता. ज्यातून मुलीचा मृत्यू झाला. या दरम्यान मुलीची झालेली तडफड पाहून हेगडे दाम्पत्य हे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे माता-पित्याने आपलंही आयुष्य संपवलं आहे. राजेवाडी येथील काणबुनाथ मंदिरासमोर असणाऱ्या एका झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन हेगडे दांपत्याने आत्महत्या केली.
मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत माहिती समजताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. मुलीचा झालेला मृत्यू हा सहन झाला नाही. यातूनच आम्ही आत्महत्या करत असून याला कोणीही जबाबदार नाही, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिल्याचं आटपाडी पोलिसांनी सांगितलं.
0 Comments