हक्कसोडपत्र तयार करून वडिलांच्या शेतजमिनीवर आईचे नाव लावण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच येणाऱ्या तलाठ्यासह एक खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नारायण विठ्ठल खरात, व्यवसाय नोकरी, पद-तलाठी सज्जा संगेवाडी अंतर्गत तहसील कार्यालय सांगोला रा. मु. पो भांब पो. गिरवी ता. माळशिरस व खाजगी इसम मयूर गुलचंद भोरे, रा. मु. पो. संगेवाडी ता. सांगोला जि. सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांचे वडील हे मयत झाले असून वडिलांचे शेतजमिनीवर वारसदार म्हणून तक्रारदार, त्यांचा भाऊ व त्यांच्या आईचे नांव लागलेले आहे. या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी तहसील कार्यालय सांगोला येथून हक्कसोडपत्र तयार करुन त्यांचे वडिलांचे शेतजमिनीवर वारसदार म्हणून केवळ त्यांचे आईचे नांव लागावे याकरिता विहित अर्जासह हक्कसोडपत्र जोडून सज्जा संगेवाडी येथे अर्ज सादर केला होता. या प्रकरणामध्ये तक्रारदार हे त्या अनुषंगाने पाठपुरावा करीत असताना यातील आरोपी तलाठी खरात यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना हक्कसोड पत्रानुसार वारसदार म्हणून शेतजमिनीवर तक्रारदार यांचे आईचे नांव लावण्याकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. या लाच रक्कम यातील आरोपी खाजगी इसम भोरे यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले होते.
या प्रकरणामध्ये पडताळणी कारवाई दरम्यान यातील खरात यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणामध्ये सापळा कारवाई दरम्यान यातील तलाठी खरात यांनी दोन हजार रुपयांची लाच रक्कम खाजगी इसम भोरे यांचेकडे देण्यास सांगितली असता इसम भोरे यांनी ती स्वीकारली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्ही आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.
0 Comments