सध्या राज्यात राज्यसभेच्या सहा जागांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. सहाव्या जागेसाठी महा विकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार आणि भारतीय जनता पार्टी कडून धनंजय महाडिक यांना उतरविण्यात आले आहे. यामध्ये अपक्ष आमदारांचा मोठा वाटा असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत या दोन आमदारांशी भाजप नेते फडणवीस हे भेटणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी क्रिकेट जागा निवडून आणण्यासाठी भाजप आणि महा विकास आघाडीकडे पुरेशी मते नाहीत. दोन्ही उमेदवारांचे मदार अपक्ष आमदारांवर असणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक अपक्ष आमदारांचा पाठिंबा महत्त्वाचा असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन अपक्ष आमदार आहेत. त्यातील करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आहे तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत जवळीक आहे. मात्र निवडणुकीत अपक्ष आमदार मतदान करण्यास कुणालाही बांधिल नाही. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा डोळा या अपक्ष आमदारांवर आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे 4 मे रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान ते अपक्ष आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यांचं मत कोणाच्या पारड्यात जाते हे पाहणे गरजेचे आहे. तर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता आहे. दोन महिन्यापूर्वी आमदार संजय मामा शिंदे यांचे मोठे बंधू माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे संजय मामा शिंदे काय भूमिका घेणार या वरील सर्वांचे लक्ष असणार आहे.
राज्यातील 29 अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी कडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोन अपक्ष मतदानाच्या दिवशी कोणासोबत जाणार हे पाहणे गरजेचे आहे. मात्र शनिवारी देवेंद्र फडणीस यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याचा भाजपाला कितपत फायदा होणार हे पाहणे गरजेचे असणार आहे. त्यातून मतदानाच्या दिवशी अपक्ष आमदार डाव टाकणार की डाव साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
0 Comments