दहावीचा निकाल लागण्याच्या अवघे काही तास आधी विद्यार्थीनीची दगडानं ठेचून हत्या !



एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थीनीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे दहावीचा निकाल लागण्याच्या अवघे काही तास आधी हा प्रकार घडला. दहावीचा निकाल लागल्यानंतर हत्या करण्यात आलेल्या मुलीला फर्स्ट क्लास गुण मिळाले होते. ही मुलगी 67 टक्के गुण मिळत उत्तीर्ण झाली होती. पण आपला निकाल पाहण्याआधीच तिची हत्या झाल्यानं खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार तालुक्यात घडली. जव्हार तालुक्यातील वडपाडा इथं घडलेल्या दहावीतील विद्यार्थीनीच्या हत्याकांडानं सगळेच हादरुन गेलेत. दरम्यान, हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचाही संशय  व्यक्त केला जातोय.

नेमकं काय घडलं?

जव्हार तालुक्यातील वडपाडा येथे एक अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडील आणि भाऊ बहिणींसह राहत होती. घरात मोठी असल्यानं ही मुलगी आपल्या आई-वडिलांना हातभार लावायची. बांधकामाच्या कामावर मोलमजुरी करायची. 14 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही मुलगी शेतावर गेली. तिथूनच ती बेपत्ता झाली होती. अखेर 15 जून रोजी 4 वाजण्याच्या सुमारास या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. जव्हार तालुक्यातील खडखड ग्रामपंचायीत्वाय हद्दीत तांबडमाळ या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीची चक्क दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, सुरुवातीच्या तपासात  या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असावी, असाही संशय व्यक्त केला जातोय. या मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टम साठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या मुलीच्या हत्येनंतर पीडितेचे आई वडील आणि भाऊ-बहीण हादरुन गेलेत. त्यांच्यावर या हत्येनं मोठा आघात झालाय. हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीला एक 12 वर्षांची बहीण, 6 वर्षांचा लहान भाऊ आणि आई वडील असा परिवार होता.

तिघांना अटक दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जातेय. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी हत्या झालेल्या मुलीच्या आई-वडिलांनी केलीय. स्थानिक पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणी पुढील तपास केला जातोय.

Post a Comment

0 Comments