भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून!



मिरज तालुक्यातील गुंडेवाडी  येथे दोन दिवसांपूर्वी लाकडी दांडक्याने डोक्यात हल्ला केल्याने जखमी झालेल्या प्रभू पोपट सूर्यवंशी (वय २२, रा. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) या तरुणाचा उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे (रा. लंगरपेठ) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाचीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे मामा सुनील शिंदे याने प्रभू सूर्यवंशी याचा खून केल्याचे समोर आले आहे. यानंतर प्रभू व त्याचा नातेवाइक ज्ञानदेव अरविंद सूर्यवंशी व सुनील शिंदे हे तिघे शुक्रवारी दुपारी मिरजेतून लंगरपेठला दुचाकीवरून (एमएच १० ओएस १२३३) जात होते. तिघेजण गुंडेवाडीत पोहोचले असता तेथे सुनील यास भाचीने घरात गळफास लावून घेतल्याचा बहिणीचा फोन आला. यामुळे रागाच्या भरात सुनील याने 'तुझ्यामुळे माझ्या भाचीने गळफास लावून घेतला. तुला जिवंत सोडणार नाही' असे म्हणत रस्त्यावर पडलेल्या लाकडी दांडक्याने प्रभूच्या डोक्यात हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने प्रभूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याबाबत ज्ञानदेव सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली.

Post a Comment

0 Comments