करमाळा येथील पोलिस, अविनाश बाळू साबळे या युवकाला झिरो पोलीस म्हणून एन्ट्री वसुलीच्या कामावर घेऊन गेले होते. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशनचे काही पोलीस आले. व त्यांनी त्या युवकांना वीस हजार रुपये मागितले. व ते वीस हजार रुपये दिले नाहीत म्हणून त्यास बेदम मारहाण केली. यामध्ये त्या युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर त्यास करमाळा येथील खाजगी भोसले हॉस्पिटल येथे घेऊन गेले. यामध्येही आश्चर्याची बाब अशी की, अविनाश साबळे याचा व्हरांड्यातच औषधोपचार करुन, पोलिसांनी तेथूनच त्या युवकास त्वरित हलविले. त्यानंतर त्यांनी काही वेळात अविनाश साबळे यास करमाळा येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ अर्धमेल्या अवस्थेत टाकून पळ काढला. अशा प्रकारचा आरोप मयत अविनाश साबळे याची आई जया बाळू साबळे यांनी केलेला आहे. व तशा प्रकारचे निवेदन हि त्यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे दिले आहे.
पुढे निवेदनामध्ये त्यांनी असे हि म्हटले आहे की, माझा मुलगा अविनाश याला करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस झीरो पोलीस म्हणून वसुलीसाठी घेऊन जात होते. २ जून २०२२ रोजीच्या रात्री ९.३० वा. गणेश बारकुंड यांनी माझ्या मुलाला फोन करून, कामावर चल असे म्हणून बारकुंड यांनी अविनाश आणि त्याचा मित्र प्रशांत खंडाळे या दोघांना घेऊन, जातेगाव येथे नगर-सोलापूर बॉण्ड्री जवळ एंट्री गोळा करण्यासाठी नेले. याबाबत गणेश बारकुंड यांनी माझ्या मुलास बोलावून घेतले. असल्याबाबतचे फोन रेकॉर्डिंग चेक केल्यानंतर, या सर्व गोष्टी आढळून येतील. अशाप्रकारे अविनाशच्या आईने सांगितलेले आहे. त्या पुढे निवेदनात असेही म्हणतात की, रात्री दहा वाजता माझा मुलगा अविनाश त्याचा जोडीदार प्रशांत व पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांचे सहकारी जगताप असे चौघेजण रस्त्यावरील ट्रक अडवून एंट्री गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यानंतर रात्री ११.३० च्या दरम्यान करमाळा पोलीस कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप व पोलीस कॉन्स्टेबल पवार मेजर असे तिघेजण खाजगी वाहनाने जातेगाव येथे एन्ट्री गोळा करण्याच्या पॉईंटला आले. व त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश बारकुंड यास सांगितले की, तू वीस हजार रुपये आम्हाला दे. नाहीतर तुझ्या या दोन्ही फंटरला मारहाण करून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो. अशा प्रकारची त्यांनी धमकी दिली. हे सर्व संभाषण ऐकून प्रशांत खंडाळे हा अंधारात पळून गेला. दरम्यान या तिघांनी माझ्या मुलास अविनाश साबळे याला पकडले. व बेदम मारहाण केली. या मारहाणीत माझ्या मुलाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे माझ्या मुलास चालता येईना व उभा ही राहता येईना. माझा मुलगा मोठमोठ्याने ओरडायला लागल्यावर, रात्री १२.३० वा. पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, सोमनाथ जगताप हे खाजगी गाडीतून निघून गेले. तर पवार मेजर हे सरकारी गाडी घेऊन निघुन गेले.
दरम्यान माझ्या मुलास जास्त लागल्याचे समजल्यावर पोलीस कॉन्स्टेबल गणेश बारकुंड यांनी दुसरा सहकारी जगताप यांच्या सहकार्याने, माझ्या मुलास पोलिसांच्या पिंजरा गाडीत टाकले. त्यानंतर बारकुंड यांनी पोलिसांची पिंजरा गाडी चालवत करमाळा येथे १२.४५ वा.च्या सुमारास येऊन बायपास जवळच्या भोसले हॉस्पिटलमध्ये आणले. त्यावेळी पवार मेजर ही त्या गाडी पाठोपाठ सरकारी गाडी घेऊन हॉस्पिटलला आले. यावेळी या पोलिसांनी माझ्या मुलावर दवाखान्याच्या व्हरांड्यातच उपचार करून घेतले. याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे. पोलिसांनी भोसले डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची नोंद केलेली नाही. दरम्यान यातील अमोल जगताप व सोमनाथ जगताप या दोघांनी पळून गेलेल्या प्रशांत खंडाळे यास जातेगाव बसस्थानकाजवळ पकडले. व त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस ऍक्ट कलम 122 प्रमाणे चोरी करण्याच्या प्रयत्नातील संशयित आरोपी म्हणून त्याला ताब्यात घेतले. व तो गुन्हा त्याच्यावर टाकून कॉटेज हॉस्पिटलला मेडिकल केले. परंतु माझ्या मुलास एवढे मारून ही त्यांनी कुटीर रुग्णालयात उपचाराला आणले नाही. आणि प्रशांत खंडाळे यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे. माझ्या मुलावर रात्री एक वाजता उपचार केल्यानंतर, पोलिसांनी त्याला १.३० वा.च्या सुमारास माझ्या घरी न आणता, अण्णाभाऊ साठे नगर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ रस्त्यावर खाली टाकून पोलीस निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तीन जून पासून, आम्ही त्याच्यावर खाजगी उपचार सुरू केले. परंतु त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने सात जूनला पुणे येथे सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. व उपचार चालू असतानाच त्याचे अकरा जूनला निधन झाले आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह आणणे व अंत्यसंस्कार करणे यातच आमचा एक दिवस गेला. व त्यानंतर त्या दुःखात दोन दिवस थांबलो.
त्यानंतर 14 जूनला आम्ही करमाळा पोलिसात गेलो. परंतु करमाळा पोलिसांनी आमचे काही एक म्हणणे न ऐकता आम्हाला तेथून हाकलून दिले. त्यामुळे नाईलाजास्तव सदरची तक्रार तुमच्याकडे देणे भाग पडत आहे. तरी करमाळा पोलीस कार्यालयातील पोलीस कर्मचारी गणेश बारकुंड, अमोल जगताप, सोमनाथ जगताप व पवार मेजर या लोकांनी एन्ट्री च्या कारणावरून माझ्या मुलास बेदम मारहाण करून, त्याच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरलेले आहेत. त्यामुळे या चौघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. त्याच प्रमाणे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत. तसेच माझ्या मुलाला कॉन्स्टेबल बारकुंड यांनी बोलावून घेतल्याचे सीडीआर मोबाईलवर सापडू शकतात. तरी या सर्व गोष्टींची शहानिशा करून मला न्याय द्यावा. अशा प्रकारचे निवेदन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना जया साबळे यांनी दिलेले आहे.
आज आमची अविनाश साबळे याच्या मृत्यूविषयीची चौकशी करण्यासंदर्भात करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे आणि DYSP विशाल हिरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. चर्चेअंती दोन्ही अधिकाऱ्यांनी अविनाशच्या मृत्यूची दोन-तीन दिवसांत सखोल चौकशी करुन, दोषींवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन दिलेले आहे, तरी प्रशासनाने योग्य चौकशी करुन पिडीत कुटूंबाला न्याय द्यावा. अन्यथा संघटनेतील कार्यकर्त्यांशी आणि समाज बांधवांशी विचार-विनिमय करुन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.
रामभाऊ वाघमारे (सोलापूर जिल्हाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन)
0 Comments