धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार



तालुक्यातील फारोळा येथे एक कारखान्यात काम करण्यासाठी परगावावरून आलेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह (३७६) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव शिरूर जिल्हा पुणे येथील एका २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वारांवर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. सदर तरुणी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ती एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे राहत होती. सदर तरुणी कामानिमित्त मुंबई येथे गेली असता तिची ओळख फारोळा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील कामगार अविनाश नामदेव आहिरे याच्याशी झाली. अविनाश हा मूळचा अहमदनगर जिल्ह्याचा गणोरी येथील तरुण आहे. तो कंपनीत काम करण्यासाठी फारोळा तालुका पैठण येथे राहतो. अविनाशशी ओळख झाल्यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अविनाशने तरुणीचा विश्वास जिंकून लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. दि. १४ मे२०२२ रोजी तिने अविनाश राहत असलेल्या फारोळा येथे येऊन अविनाशला लग्न करण्याची विनंती केली, मात्र त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. अविनाशने या तरुणीवर फारोळा, रांजणगाव अशा वेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून बिडकीन पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments