पंकजनगर बार्शी येथील मुस्लिमा लुथफार सरदार वय-३५ वर्षे या महिलेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम -३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील महिलेस महाबूर १२ वर्षे व आसिक १० वर्षे दोन मुलं आहेत.मुस्लिमा ही मुळची पश्चिम बंगाल या राज्यातली असून कामाच्या निमित्ताने ती महाराष्ट्रात आली होती.
अधिक माहिती अशी की ,बागबुल उर्फ शाकिर हुसैन शेख वय-३८ वर्षे रा.कलबंगा,ता.नाक्षिपारा,जि.नाडिया पश्चिम बंगाल येथील असून मयत महिलेसोबत तो ३ वर्षांपासून राहत होता. दि. २८ मे रोजी बागबूल याने सकाळी मयत महिलेस कामावर जाऊ नकोस असे म्हणून भांडण केले होते. त्यानंतर चार वाजताचे सुमारास बागबुलने मयत महिलेच्या दोन्ही मुलास बाहेर जाऊन खेळण्यास सांगितले होते. थोड्यावेळाने दोन्ही मुले खेळून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा समोरील दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तो उघडला नाही. खूप वेळ झाला तरी दरवाजा न उघडल्याने त्यांच्यापैकी आसिक हा पाठीमागील दरवाजाकडे गेला असता त्यावेळी दरवाजा उघडा असुन मयत महिला किचनमध्ये खाली पडलेली दिसली व तिच्या गळ्याभोवती ओढणी असल्याचे दिसले. तसेच त्याने समोरील दरवाजा उघडून महाबुर यास आतमध्ये बोलविले व दोघांनी मयत महिलेस उठविण्याचा प्रयत्न केला परंतू आई उठत नसल्याने तसेच बागबुल ही कोठे दिसत नसल्याने त्यांनी त्यांचे घरमालक बापू मिरगणे यांना फोन करून सर्व प्रकार सांगून बोलावून घेतले. बापू मिरगणे हे घरी आल्यानंतर त्यांनी शेजारील सबिना निजाम खान यांचे मदतीने सदर महिलेस जगदाळ मामा हॉस्पीटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी सदर महिला मयत झाली असल्याचे सांगून त्याबाबत पोलीस ठाणेस कळविले. त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या घरी आलेला बागबुल याचा शोध घेतला परंतू तो कोठेही मिळून आला नाही. त्याचा व मयत महिलेचा मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मोबाईल स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. तसेच वैदयकीय अधिकारी यांनी मयत महिलेची पाहणी केली असता तिच्या हनुवटीखाली तसेच कपळाचे वरील बाजूस केसामध्ये पायावर जखमांचे व्रण दिसत असल्याने प्रथमदर्शनी सदर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे दिसून आले.
त्यामुळे पोलिस प्रशासनाने तेथे तात्काळ दोन महिला पंचांना बोलावून त्यांचे समक्ष मयत महिलेचे बारकाईने निरिक्षण केले असता तिच्या कपाळाच्या वरील बाजूस केसामध्ये जखम असून त्यामधून रक्त आलेले दिसले. तसेच गळ्यावर थोडेसे लालसर व्रण दिसले.हनुवटीखाली दोन ठिकाणी जखमेचे व्रण दिसत होते. एकंदर मयताचे स्थितीवरून मयत महिलेचा घातपात झाला असल्याची शक्यता वाटली. सदर महिलेच्या प्रेताचा पंचनामा करुन महिलेच्या मरणाचे निश्चित कारण समजण्याकरिता महिलेचे प्रेत ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे पोस्टमार्टम करिता पाठवून दिले.त्यानंतर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून बागबूल उर्फ झाकिर हुसेन याने कामावर जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारल्याचा संशय व खात्री झाल्याने पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ यांनी भादंवि कलम - ३०२ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.
0 Comments