स्वस्त धान्य दुकानदाराकडून बाराशे रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षकासह खासगी इसमाला मंगळवेढा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
पुरवठा निरीक्षक उत्तम वामन गायकवाड (वय ३९) व खासगी इसम संगणक चालक बालाजी सिध्देश्वर यादव (वय २५) अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदारांचे मंगळवेढा येथील वडार गल्लीमध्ये स्वस्त धान्य दुकान असून प्रत्येक महिन्याला धान्याच्या चलनाची रक्कम तहसील कार्यालय मंगळवेढा अंतर्गत असलेल्या शासकीय धान्य गोदाम येथे चलनाद्वारे भरावी लागते. ते मे महिन्याच्या मासिक धान्याची चलनाची रक्कम भरण्याच्या अनुषंगाने यादव याला भेटले असता त्याने चलनाच्या रकमेव्यतिरिक्त स्वतःकरिता अडीचशे रुपये व साहेबांकरिता बाराशे रुपये अशी रक्कम हप्ता म्हणून द्यावी लागेल, असे सांगून लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आपली तक्रार नोंदविली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवेढा येथे सापळा लावला. गायकवाड यांनी सदर लाचेची रक्कम आरोपी यादव याच्याकडे देण्यास सांगून ती स्वीकारल्यानंतर दोन्ही आरोपींना रंगेहाथ पडण्यात आले आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार घाडगे, मुल्ला, सन्नके, यांनी केली.
0 Comments