कोल्हापूर! लडाख येथे झालेल्या अपघातात कोल्हापुरातील जवानाला वीरमरण


कोल्हापूर/प्रतिनिधी:

लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सैन्यदलातील सात जवानांना वीरमरण आले आहे. तर, अन्य जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील जवान प्रशांत शिवाजी जाधव ( वय २७ ) या जवानाचे सुद्धा निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे हे जवान प्रशांत शिवाजी जाधव यांचे मूळ गाव. घरी आई, वडील, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वीच २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना १ वर्षांची मुलगी आहे. २०१४ मध्ये ते सैन्यदलात रुजू झाले होते. सध्या ते जम्मू काश्मीर येथे रुजू होते.

मात्र, काल ( २८ मे ) लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा नदीमध्ये कोसळून अपघात झाला. यात सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये प्रशांत जाधव यांचाही समावेश आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर सध्या शोककळा पसरली आहे. दरम्यान, जाधव यांचे पार्थिव विमानाने बेळगाव येथे आणले जाण्याची शक्यता आहे. तेथून जन्मगावी त्यांचे पार्थिव आणण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. शासकीय इतमामात प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments