बेकायदेशीर सावकारी प्रकरणी तालुक्यातील उपळाई येथील अशोक नरसिंह लंगोटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. लंगोटे याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात १ जानेवारी २०२२ रोजी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी सचिन महाडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. परंडा तालुक्यातील रोसा येथील गणिता दादाराव गव्हाळे यांच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन जाकीर पाशा पटेल (रा. परंडा) व अशोक नरसिंह लंगोटे (रा.बार्शी) यांनी सावकारीपोटी खरेदी घेतली होती. त्यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे याची तक्रार केली होती. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. २१/०९/२०२१ रोजी सहकार विभागाच्या पथकाने लंगोटे याच्या उपळाई (ठोंगे) येथील घरी आणि बार्शी शहरातील श्री ज्वेलर्स या दुकानी धाड पातली असता तेथे मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारकीची कागदपत्रे मिळून आली. त्यानंतरही सुमारे तीन महिने त्यावर काहीही कारवाई झाली नाही.
अखेर प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक लंगोटे याच्यावर गुन्हा दाखल झाला. लंगोटे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने लंगोटे याच्या दुकानातून आणि घरातून अनेक खरेदीखते, चेक, रोखीच्या पावत्या, बँक पासबुक, पावती पुस्तक जप्त करण्यात आली आहेत. त्यांची संख्या सुमारे ८४ आहे. प्रथमदर्शनी लंगोटे वैध परवान्याशिवाय सावकारी करत असल्याचे आढळून येत आहे. त्यास जामिनावर सोडल्यास तो फिर्यादी आणि इतर साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता आणि स्वरुप पाहता आरोपीस अटकपूर्व जामीन देणे योग्य नाही, असा निष्कर्ष काढून अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी अर्ज फेटाळला.
0 Comments