पायी चालत जाणाऱ्या एकाचा क्रेनने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूर शहरातील मरिआई चौकाकडून डोणगाव रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
अविनाश गजेंद्र बोबडे (वय ५७) जुनी लक्ष्मी चाळ, डोणगाव रोड असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. सोमवारी रात्री मयत अविनाश बोबडे हे मरीआई चौकाकडून पायी चालत जुनी लक्ष्मी चाळ इकडे मधल्या वाटेने जात होते. त्यावेळेस समोरुन एम एच १३ सी एस १२३७ हा क्रेन वेगात आला. त्याने पायी चालणाऱ्या बोबडे यांना जोराची धडक दिली या धडकेत बोबडे उडून बाजूला पडले, अपघात झाल्याचे समजताच क्रेन चालक क्रेन सोडून पळून गेला.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी जखमी बोबडे यांना रिक्षात घालून उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत क्रेन चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली असता पोलिसांनी तातडीने चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
0 Comments