सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री बंद झाल्यास गुन्हेगारी कमी होईल, असा विश्वास बाळगून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात 'ऑपरेशन परिवर्तन' हा उपक्रम राबविले. त्यातून त्यांनी त्या लोकांचे समुपदेशन व पुनर्वसन केले. १८ महिन्यात ६०४ जणांनी तो व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोकसभेत केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांड्याची ओळख वर्षानुवर्षे हातभट्टी दारू निर्मितीचे गाव, अशीच होती. कायदा पायदळी तुडवून अवैध व्यवसाय करणाऱ्यांची मुले शिकून मोठी होऊ शकतात, तेही अधिकारी बनू शकतात. हा आत्मविश्वास पोलिस अधीक्षकांनी सुरवातीला त्या लोकांमध्ये निर्माण केला. पण, केवळ समुपदेशनाने काहीच होणार नाही, याची जाणीव ठेवून त्यांनी तो व्यवसाय मुळासकट बंद होण्यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने एक कृती आराखडा तयार केला आणि त्याला 'ऑपरेशन परिवर्तन' असे नाव देण्यात आले. त्यानंतर ६० गावांमध्ये तयार होणारी हातभट्टी दारु परिसराचील १२४ गावांमध्ये विक्री होते, हे लक्षात आले. त्यांनी प्रत्येक गाव आपल्या अधिकार्यांना दत्तक दिले. आठवड्यातून तीनवेळा वेगवेगळ्या दिवशी त्याठिकाणी छापे टाकल्याने त्यांचा तोटाच अधिक होऊ लागला. त्यावेळी त्या लोकांनी हा व्यवसाय बंद करून नवा व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली. त्यातून जवळपास सहाशे व्यक्तींनी तो अवैध व्यवसाय सोडला आहे.
0 Comments