या 4 कारणांमुळे लिंबाच्या किमती वाढल्या; 400 KG पर्यंत पोहोचले भाव


उन्हाळ्यात लिंबाला (Lemon) मोठी मागणी असते. परंतु, यंदा लिंबाच्या किंमती गगनाला भिडल्याने उष्म्यासोबतच आर्थिक चटकाही नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत लिंबाच्या दराने (Price) सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. एरव्ही 50-60 रुपये प्रतिकिलो दराने लिंबाची विक्री होते.


एक लिंबू(Lemon) दोन ते तीन रुपयांना मिळते. तेच लिंबू आज काही शहरांमध्ये 300 ते 400 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. एका लिंबाचा दर 10 ते 15 रुपयांवर पोहोचला आहे. लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.

पावसामुळे पिकाचं नुकसान झालं आहे. परिणामी उत्पादन कमी झालं असून दुसरीकडे सण-समारंभ आणि उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी वाढली आहे. मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडल्याने लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. याचबरोबर अनेक भाज्यांचे दरही वधारले आहेत.

`दैनिक भास्कर`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत लिंबाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 250 ते 400 रुपये किलो दरानं लिंबू(Lemon) विक्री होत असून, रिटेल मार्केटमध्ये (Retail Market) एका लिंबासाठी 10 ते 15 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत (Delhi) लिंबाचे दर 250 ते 300 रुपये किलो आहेत.


 
मुंबई, हैदराबाद आणि कोलकता येथे महिनाभरापूर्वी लिंबाचे दर 50 ते 100 रुपये किलो होते, हेच दर सध्या 300 ते 400 रुपये प्रतिकिलोंवर पोहोचले आहेत. पुण्यातल्या (Pune) होलसेल मार्केटमध्ये 10 किलो लिंबू गोणी 1750 रुपयांना विकली जात आहे. पुण्यातल्या रिटेल मार्केटमध्ये एका लिंबाचा दर सुमारे 10 ते 15 रुपये आहे. देशातल्या प्रमुख शहरांचा विचार करता, मुंबईत एका लिंबाचे दर 15 रुपये, लखनौमध्ये 6 रुपये, दिल्ली, कोलकता, अहमदाबाद भोपाळमध्ये 10 रुपये, जयपूर, पणजीमध्ये 12 रुपये याप्रमाणे आहेत.


 
लिंबाचे दर वाढण्यामागे ही आहेत कारणं यंदा मार्च महिन्यात मे महिन्याप्रमाणे तापमान (Temperature) आहे. सरासरी तापमान 38 ते 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे लिंबाला मागणी (Demand) लवकर आणि मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये तापमान वाढल्याने लिंबू उत्पादनावर परिणाम झाला आहे.

हिंदू धर्मीयांचा नवरात्रोत्सव आणि मुस्लिम धर्मीयांचा रमजान यामुळे लिंबाला मागणी वाढली आहे. मात्र मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने लिंबाचे दर वाढले आहेत. देशात 22 मार्चनंतर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. लिंबाचे दर वाढण्यास इंधन दरवाढ हा घटकही कारणीभूत आहे.

इंधनाच्या किमती वाढल्याने लिंबू ट्रान्सपोर्टेशनचा (Transportation) खर्च प्रतिट्रकमागे 24 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. वाहतूक महागल्याने त्याचादेखील परिणाम लिंबाच्या दरावर दिसून येत आहे, असं जाणकारांनी सांगितलं. अतिरिक्त पाऊस (Rain) आणि जास्त तापमानामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ (Cyclone) आणि सरासरीपेक्षा अधिक तापमानामुळे आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या प्रमुख लिंबू(Lemon) उत्पादक राज्यांमध्ये पिकाचं नुकसान झालं.

गुजरातमध्ये मागील वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा फटका लिंबू पिकाला बसला. देशाच्या एकूण लिंबू उत्पादनापैकी 17 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन गुजरातमध्ये (Gujarat) होतं. आंध्र प्रदेशनंतर गुजरात लिंबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण चक्रीवादळाने पिकाचं नुकसान झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.

देशातले शेतकरी वर्षभरात लिंबू उत्पादनासाठी बहार तंत्राचा वापर करतात. बहार तंत्रात शेतकरी बागेचं सिंचन थांबवून रसायनांची फवारणी करतात. त्यानंतर बागांची छाटणी होते. पुन्हा रसायनांची फवारणी करून सिंचन केलं जातं.

त्यानंतर झाडांना फूलधारणा होते आणि लिंबू(Lemon) उत्पादन होते. लिंबू उत्पादक वर्षभरात आंबिया,मृग आणि हस्त असे तीन बहार घेतात. लिंबाच्या झाडाला होणाऱ्या फुलधारणेवर या बहारांची नावे आधारित आहेत. आंबिया बहारात जानेवारी-फेब्रुवारीत फळधारणा होते, एप्रिलपासून उत्पादन सुरू होतं.

मृग बहारात लिंबाच्या झाडाला जून-जुलैत फूल धारणा होते तर ऑक्टोबरमध्ये फळधारणा होते. हस्त बहारात सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये फूलधारणा तर मार्चनंतर उत्पादन सुरू होते. देशात 60 टक्के लिंबू उत्पादन आंबिया बहरात होते. मृग बहारात 30 टक्के तर उत्पादन होते.

परंतु, प्रतिकूल हवामानामुळे लिंबाचे दोन्ही हंगाम म्हणजे हस्त बहार (Hasta Bahar) आणि आंबिया बहार (Ambiya Bahar) वाया गेले. त्यामुळे लिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला. मागील वर्षी मान्सून चांगला राहिला मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसाने हस्त बहाराचं नुकसान झालं.

परिणामी या हंगामात झाडाला फूलधारणा कमी झाली. फेब्रुवारीच्या अखेरीपासून तापमानात वाढ होऊ लागल्यानं लिंबू(Lemon) बागांवर परिणाम झाला. फळगळतीमुळे नुकसान झालं. यंदा हस्त बहारात कमी उत्पादन हाती आल्यानं शेतकऱ्यांना फारशी लिंबाची साठवणूक करता आली नाही.

त्यातच आंबिया बहाराच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाल्याने उत्पादनात घट झाली. सर्वसामान्यपणे उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते, याकाळात हस्त बहारात साठवणूक केलेला माल आणि आंबिया बहारातलं उत्पादन यामुळे पुरवठा व्यवस्थित करता येतो. पण या दोन्ही हंगामात फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे. यंदाचं वर्ष आमच्यासाठी फारसं चांगलं नाही.

दोन्ही बहारात लिंबाचं नुकसान झालं. कमी उत्पादनामुळे देशभरात लिंबाचे दर प्रचंड तेजीत आहेत, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. हे ही देशातल्या या राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार, काही भागात पडणार मुसळधार पाऊस देशातील लिंबू उत्पादनाची स्थिती देशातल्या 3.17 लाख हेक्टरवर लिंबाचं उत्पादन (Production) घेतलं जातं. लिंबू उत्पादनाचा विचार करता, देशात आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम, तेलंगणा, बिहार आणि पश्चिम बंगाल ही टॉप 10 राज्यं आहेत.

सर्वसाधारणपणे लिंबाच्या एका झाडापासून वर्षात तीन वेळा फळं मिळतात. आंध्र प्रदेश लिंबू उत्पादनात देशात अव्वल असून, तिथं 45 हजार हेक्टरवर लिंबू उत्पादन होतं. देशात लिंबाचे लेमन (Lemon) आणि लाइम (Lime) दोन प्रकार दिसून येतात. लहान, गोल आणि बारीक साल असलेलं कागदी लिंबू हे सर्वसामान्य वाण आहे.

लाइममध्ये गडद हिरव्या रंगाच्या लिंबाचा समावेश होतो. उत्तर आणि ईशान्य भारतात व्यावसायिक उद्देशानं याचं उत्पादन घेतलं जातं. दरवर्षी भारतात 37 लाख टन लिंबू उत्पादन होतं. लिंबाची आयात आणि निर्यात होत नाही.

लिंबाचे दर कधी कमी होणार ? लिंबाचे दर लगेच कमी होण्याची शक्यता नाही. मात्र येत्या काही दिवसात दरात काहीशी घट होईल. मागील काही दिवसांत दिल्लीत लिंबाचे दर काहीसे कमी झाले आहेत. सध्या दिल्लीत आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणातून लिंबाची आवक (Arrival) होत आहे.

ही आवक सर्वसामान्यपणे मे महिन्याच्या अखेरीस होते. पण मागणी आणि पुरवठ्याचं (Supply) गणित विस्कळीत झाल्याने लिंबू लवकर पाठवले जात आहेत. ही लिंबं हिरवी असून परिपक्व नाहीत. त्यामुळे किमती लगेच कमी होण्याची शक्यता नाही.

जाणकारांच्या मते ऑक्टोबरपर्यंत लिंबाचे दर कमी होतील. कारण सध्याचे लिंबू पीक ऑक्टोबरपर्यंत परिपक्व होईल आणि आवक सुधारेल. ज्या भागात हवामान चांगले असल्याने लिंबू उत्पादनावर परिणाम झालेला नाही, तेथून आंबिया बहारातील लिंबांची आवक होऊ शकते. भाज्यांचे दरही वधारले राजधानी दिल्लीत लिंबाप्रमाणेच अन्य भाज्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत टोमॅटोचे दर 42 रुपये, बटाटे 26 रुपये, कांदे 44 रुपये, लाल मिरची 66 रुपये, कारली 54 रुपये, फ्लॉवर, वांगी 62 रुपये, सिमला मिरची 86 रुपये तर भेंडी 78 रुपये किलो आहे.

Post a Comment

0 Comments