“उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका…”


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकराने तीव्र निषेध व्यक्त केला असताना दुसरीकडे भाजपाकडून देखील राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

यासंदर्भात आता भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

“केंद्रीय तपास यंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावं. देव, देश आणि धर्मासाठी हे बोलायची नाही, उद्धवजी आता करण्याची वेळ आली आहे. उद्धवजी, दाऊद आणि त्यांच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“शरद पवारांसमोर झुकू नका. नवाब मलिकांची हकालपट्टी करा. या तीन पक्षांमध्ये आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडेच आहे. अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. “आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी या प्रकरणांचा कसा संबंध आहे यासंदर्भातल्या चौकशीला राज्य सरकार थांबवू का पाहात आहे? हे मर्दांचं सरकार आहे म्हणणारे आता बोटचेपी भूमिका का घेत आहेत हा आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

Post a Comment

0 Comments