मुंबई :
या संपूर्ण अधिवेशनात राज्य सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. जनतेचे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडले. मात्र, कोणत्याच प्रश्नाला राज्य सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आज होता. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर हल्ला चढवला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही समोर आणले. तसेच सरकारी वकील कशाप्रकारे विरोधी पक्ष नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात, याबाबतचा पेन ड्राईव्ह आम्ही विधानसभेत दाखवला. या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देऊन हा तपास दाबण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
मग पोलीस तुमचे घरगडी का? - सध्या परस्थिती अशी झाली आहे की, ईडी म्हणजे भाजपाची घरगडी झाला असल्याचा टोला भाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला लगावला होता. परंतु, विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. मग पोलीस राज्य सरकारचे घरगडी झाले आहेत का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
0 Comments