फिर्यादी राजशेखर शिवराया बिराजदार (वय वर्षे 45),राहणार आहेरवाडी,तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादीची मौजे आहेरवाडी येथे वडीलोपार्जित शेती दिनांक 23 मार्च 2005 रोजी फिर्यादीच्या प्रापंचिक अडचणीसाठी आणि कर्ज झाल्यामुळे फिर्यादीच्या शेतीवर फिर्यादीच्या गावचा सावकार सिध्दाराम महादेव दिंडोरे याला दर साल दर शेकडा अडीच टक्या प्रमाणे व्याजाने 10 वर्षे मुदतीकरीता 75 हजार रूपये घेतले होते.सदरच्या शेतजमीनीचा कब्जा फिर्यादीकडेच होता.त्यानंतर सिध्दाराम दिंडोरे याला फिर्यादी नियमित दरमहा घेतलेल्या रकमेच्या व्याजाची रक्कम दिली व ६ महिन्यांनंतर उर्वरित व्याजासहीत रक्कम परत
देण्यासाठी गेले असता त्याने रक्कम न घेता फिर्यादीला शिवीगाळ,दमदाटी करून फिर्यादीला हाकलून दिले व रक्कम घेण्यासाठी टाळाटाळ करीत राहिला.
त्यानंतर पुन्हा फिर्यादीने गावातील राजु नंदुरकर यांना मध्यस्थी घेवून सावकार सिध्दारीम दिंडोरे याच्या घरी गेले असता तेंव्हा देखील सिध्दाराम दिंडोरे या सावकाराने फिर्यादीला हाकलुन दिले.त्यानंतर फिर्यादीने फिर्यादीची पत्नी संगिता यांच्या सोबत सावकाराच्या घरी जावून विनंती केली असता एनटीपीसी कंपनी आहेरवाडी गावात आल्याने शेतीला जास्त भाव येणार असल्याने सावकार सिध्दाराम दिंडोरे याने 'तू मला बाजारभावाप्रमाणे चालू असलेली रक्कम दे नाही तर तुझी शेती तुला देणार नाही.तुला काय करायचे ते कर' अशी धमकी दिली.फिर्यादीने सावकारा कडून घेतलेली संपूर्ण रक्कम व्याजासहीत देवूनही सावकार सिध्दाराम दिंडोरे यांनी फिर्यादीची लिहून घेतलेली शेती परत दिली नाही.काही दिवसांनी फिर्यादीला समजले की,सिध्दाराम दिंडोरे यांनी 75 हजार रूपये फिर्यादीला देवून फिर्यादीची शेतजमीन स्वत:च्या नावे खरेदीखत करून घेतलेली आहे.सदर शेतजमीनीचा कब्जा अद्यापपर्यंत फिर्यादी कडेच आहे.सावकार सिध्दाराम दिंडोरे याने त्याच्याकडे कोणताही सावकारी परवाना नसताना सावकारी करून फिर्यादीची शेतजमीन लुबाडली आहे.
त्याचप्रमाणे फिर्यादीच्या आहेरवाडी गावातील सुरेश भिमशा कोळी यांचे दिनांक 8 जुलै 2008 रोजी आहेरवाडी येथील शेती 1 लाख रूपये देवून शेती खरेदीखत करून स्वत:च्या नावे करून घेतली व सदरची शेतजमीन ही एनटीपीसीमध्ये भूसंपादन झाली आहे.त्यापूर्वी सदर शेतीचा कब्जा हा सुरेश कोळी यांचेकडेच होता व सदरची शेतजमीन एनटीपीसी प्रकल्पांतर्गत भूसंपादन झालेली आहे.त्याचप्रमाणे नबीलाल दौलत् बागवान यांचे आहेरवाडी येथील शेतजमीन 20 हजार रूपयाला,स्वप्निल सदाशिव जाधव,राहणार सावतखेड याचे मौजे सावतखेड येथील शेती 1 लाख 90 हजार रूपयाला तसेच त्यांची आई जयश्री सदाशिव जाधव यांचे नावे असलेले मौजे मजरेवाडी येथील गाळा क्रमांक 17 व 13 हे 1 लाख 50 हजार रूपयाला अवैध सावकारी करून घेतलेली आहे.
या सर्व शेतकर्यांनी सावकार सिध्दाराम दिंडोरे याला त्याच्याकडून घेतलेल्या पैशाची संपुर्ण व्याजासहीत रक्कम देवूनही त्याने या सर्व शेतकर्यांची शेतजमीन परत खरेदी करून दिली नाही आणि चालू बाजार भावाप्रमाणे पैशाची मागणी करीत आहेत.
म्हणून सावकार सिध्दाराम दिंडोरे याच्या विरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 नुसार कलम 39 आणि 45 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार अत्तार आणि पोलीस नाईक बंदिछोडे हे करीत आहेत.
सिध्दाराम दिंडोरे या सावकाराबद्दल आणखीन कोणाची तक्रार असल्यास त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता,न घाबरता वळसंग पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
0 Comments