पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भदौड आणि चमकौर साहेब अशा दोन्ही मतदारसंघातून पराभवाचा जोरदार झटका नागरिकांनी दिला आहे. भदौर हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत सुरक्षित मानला जात होता. परंतु, आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभ सिंग उगोके यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा तब्बल ३७ हजार ५०० मतांनी हरवले आहे. यामुळे पंजाबसह देशभर लाभ सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. लाभ सिंग उगोके हे गरीब घरातून येतात.
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आम आदमी पक्षा'कडून तिकीट मिळवणारे लाभ सिंग एका साध्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात नोकरी करतात. त्यांची आई एका सरकारी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करते, तर वडील शेतात मजुरी करतात. लाभ सिंग यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल आहे. लाभ सिंग उगोके २०१३ साली एक स्वयंसेवक म्हणून आम आदमी पक्षात दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांचा आपमध्ये प्रवास सुरू झाला.
पंजाबमधील जोरदार विजयानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना लाभ सिंग यांचा उल्लेख केला. कॅप्टन, सिद्धू, चन्नी यांना पराभूत करून पंजाबच्या नागरिकांनी चमत्कार केला, असे केजरीवाल म्हणाले. तसेच मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव कोणी केला, हे तुम्हाला माहीत आहे का? मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या लाभ सिंग उगोके यांनी मुख्यमंत्र्यांना पछाडले, असेही केजरीवाल म्हणाले.
0 Comments