चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत येऊच शकत नाहीत...



फडणवीस सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे पाच वर्षे ऊर्जा मंत्री होते. त्यांच्या काळात झालेल्या सगळ्याच कामांची चौकशी होणार आहे. त्या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. महिन्याभरात ही समिती आपला अहवाल सादर करेल.फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महावितरणमध्ये अनेक पायाभूत कामं झाली. मात्र, याच कालावधीत महावितरणची थकबाकीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली. बावनकुळे यांच्या काळात महावितरणने हाती घेतलेल्या कामांची खरंच गरज होती का, त्या कामांचा लोकांना फायदा झाला का, हे शोधण्याचं काम चौकशी समिती करणार आहे.याबाबत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

आमदार बावनकुळेंची  कुठलीही चौकशी होत नाहीये, तर त्यावेळी आम्ही जे प्रकल्प राबविले, त्याची चौकशी राज्य सरकार करणार आहे. महत्वाचं म्हणजे, हे प्रकल्प मंत्री करत नाही, तर कंपन्या करत असतात, येवढी साधी बाब राज्य सरकारला कळायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या तीन कंपन्यांनी ते प्रकल्प केले. त्यामुळे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत येण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. बावनकुळेंनी उत्तम काम केलेले आहे, ते अडचणीत येऊच शकत नाहीत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments