गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.
राज्यातील सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीसाठी सिल्व्हर ओकवर बोलावले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर पोहोचणार आहे.अजित पवार सिल्व्हर ओकेवर पोहोचले आहे. तिथून शरद पवार यांच्याकडे जाणार आहेत. तिथून दोघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर जाणार आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादीची नवीन रणनीती ठरणार आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पहाटेच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी सातवाजेपासून चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी अटक केली. अटक केल्यानंतर मलिक यांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
0 Comments