सोलापूर! मैत्रिणीच्या आजीकडे बेपत्ता मुली आढळून आल्या



सोलापूर/प्रतिनिधी:

शाळेत गेलेल्या विडी घरकूल परिसरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. वळसंग पोलिसांनी शोध घेऊन कलबुरगी येथून त्या मुलींना सुखरूप ताब्यात घेतले, याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांचा जीव भांड्यात पडला. सकाळी ११ वाजता घरातून शाळेत गेलेल्या १४ वर्षीय दोन मुली शाळेत न जाता त्यांनी कलबुरगीची वाट धरली. घरी पाल्याने आई-वडिलांसह नातेवाइकांनी रात्री आठपर्यंत इतरत्र शोधाशोध केली. मात्र त्या सापडल्या नाहीत. 

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वळसंग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुली हरवल्याची फिर्याद माता-पित्यांनी दिली. फिर्याद घेण्याची प्रक्रिया चालू असतानाच सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी तपासाची चक्रे सुरू केली. वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊन स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि इतर माध्यमांच्या मदतीने तपास सुरू केला. दरम्यान तपास पथके कलबुरगी येथे गेल्यानंतर तिथे मैत्रिणीच्या आजीकडे मुली आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वळसंगला परतले. ही कामगिरी सहायक निरीक्षक भोसले, पोलीस अंमलदार श्रीनिवास दासरी, विक्रम माने, प्रसाद मांढरे, घरेप्पा होनमोरे, सायबरचे फौजदार सूरज निंबाळकर, कर्मचारी व्यंकटेश मोरे यांच्यासह कलबुरगी येथील प्रभारी पोलीस निरीक्षक बसू चव्हाण, पोलीस कर्मचारी नागेंद्र, अनिल, प्रकाश यांनी केली.

Post a Comment

0 Comments