पंढरपूर:
रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. यामध्ये रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे सध्या युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंढरपूर येथील युक्रेनला उच्च शिक्षणासाठी गेलेला प्रसाद भाऊसाहेब शिंदे नाईक हा विद्यार्थीसुद्धा तिथे अडकला आहे. सरकारने विद्यार्थ्यांना मायदेशी परत घेऊन यावे, अशी कळकळीची विनंती शिंदे नाईक कुटुंबाने केली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. भारतातील युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेले वीस हजार विद्यार्थी तिथे अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल बाराशे विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून आहेत. यासाठी पंतप्रधान कार्यालय, राज्य सरकार विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पंढरपूर शहरातील प्रसाद शिंदे नाईक युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. गेल्या पाच दिवसांपासून युक्रेन येथील युद्धाची परिस्थिती पाहता त्याला मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, रशियाने युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्यामुळे प्रसाद शिंदे याचा विमान प्रवास लांबणीवर पडला व त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तरी भारत सरकारने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे कळकळीचे आवाहन प्रसादच्या वडिलांनी केले आहे.
0 Comments