विराट कोहलीचा फॉर्म गेल्या काही काळापासून खराब आहे. नोव्हेंबर 2019 नंतर विराटला शतक करता आलेलं नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्येही विराटची बॅट शांतच राहिली.
विराटच्या या फॉर्मबाबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अजिबात चिंतेत नाही. विराटबद्दल चाललेल्या चर्चा बंद झाल्या, तर गोष्टी आपोआप ठीक होतील, असं रोहित म्हणाला आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 10 पेक्षा कमीच्या सरासरीने 26 रन केले. कोहलीच्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये फक्त दुसऱ्यांदा त्याला 3 वनडेच्या सीरिजमध्ये 10 पेक्षा जास्त रन करता आले नाहीत.
या सीरिजमध्ये विराटची सरासरी 8.6 ची होती. याआधी 2012-13 साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजमध्ये विराटने 3 इनिंगमध्ये 4.33 च्या सरासरीने 13 रन केले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजआधी रोहित शर्मा पत्रकारांशी संवाद साधत होता, तेव्हा त्याला विराटबाबत प्रश्न विचारण्यात आला. ‘मला वाटतं याची सुरूवात तुमच्यापासूनच होते.
जर तुमच्याकडून चर्चा बंद झाल्या, तर बाकीच्या गोष्टींवर लक्ष दिलं जाऊ शकतं. कोहली कोणत्याही दबावात नाही. लवकरच तो मोठी खेळी करेल,’ असं रोहित म्हणाला. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही रोहितने विराटचा बचाव केला होता. ‘विराटला आत्मविश्वासाची गरज आहे? तुम्ही कशाबद्दल बोलताय. 100 रन करता न येणं वेगळी गोष्ट आहे. पण दक्षिण आफ्रिकेत त्याने एक सीरिज खेळली, यातल्या 3 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकं केली.
मला काहीच चूक दिसत नाहीये. टीम याबाबत अजिबात चिंतेत नाही,’ अशी प्रतिक्रिया रोहितने दिली होती. ‘विराट एका दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. एवढा काळ घालवल्यानंतर दबावाला कसं हाताळायचं हे त्याला नेमकं माहिती आहे,’ असं वक्तव्य रोहित शर्माने केलं आहे.
0 Comments