माढा! अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या कडून 90 लाखांचा मुद्देमाल जप्त ; सोलापूर ग्रामीण एस सी बी ची धडाकेबाज कामगिरी



माढा तालुक्यातील मुंगशी येथील सिना नदीपात्रातुन मोठ्या प्रामाणात खुलेआम वाळु चोरी होत असल्याची गोपनिय माहीती स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांना मिळाली. या माहीतीच्या आधारे हि कारवाई करण्यात आली.
 
दुपारी ३ च्या सुमारास मुंगशी गावातील संभाजी शिवाजी गावले यांच्या शेताच्या बाजूस सीना नदीमध्ये काही इसम व पोकलेन, टिपर, टॅक्टरने सीना नदी पात्रातून चोरून वाळूचे उत्खनन करून टिपर व ट्रक्टरमध्ये भरत होते.  त्यांना पोलिस पथकाचा  संशय येवू नये म्हणून सरकारी वाहन उत्तरेकडील बाजूस लावून पायी चालत नदी पात्रात जात असताना पोलिस आल्याची चाहूल लागल्याने पोकलेन, जेसीबी, टिपर व ट्रक्टरचे चालक हे नदी पात्रातून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून महादेव अरूण पवार, रा. कुर्डू ता. माढा व सागर गोरख घुगे या दोन चालकांना पकडले. तसेच वाहनांचे मालक आनंद उर्फ भैय्या माळी  रा. कुर्डू, योगेश उर्फ काका पराडे  रा. संगम ता. माळशिरस, पोकलेनचे मालक इंद्रजित महाडिक, रा. मुंगशी, जेसीबी मालक पराडे रा. संगम ता. माळशिरस यांच्यावर भादवि ३७९,३४ भारतीय पर्यावरण कायदा कलम ९, १५  प्रमाणे फ़िर्यादी पोलिस हेड कॉंस्टेबल हरीदास आगतराव पांढरे, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर यांच्या फ़िर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

या कारवाईत तेरा लाख पन्नास हजार किमतीचे तीन ट्रॅक्टर व ट्रेलर, पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे तीन हायवा टिपर, बारा लाख रुपये किमतीचा JCB, वीस लाख रुपये किमतीचे सनी  कंपनीचे पोकलेन असा साधारण नव्वद लाख पंचाएंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापैकी एकाही वाहनांवर RTO नंबर नाहीत. विशेष म्हणजे पोकलेनवर तर इंजिन आणि चासी नंबर नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जप्त मुददेमालापैकी वाळूने भरलेला टिपर MH- 04-FU -3365 हा टायर फुटल्यामुळे व पोकलेनची चावी नसल्याने जागीच उभी करण्यात आलेली आहेत. सदरची दोन्ही वाहने बीट अमंलदार घोरपडे, कुर्डूवाडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिलेली आहेत. उर्वरीत वाहने व त्यातील वाळू कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments