boyfriend सोबत पळाली अल्पवयीन मुलगी,अन् बाळासह सापडली!


 
नागपूर : कळमना हद्दीत राहणारी १६ वर्षांची मुलगी प्रियकरासोबत  अचानक बेपत्ता झाली. चिंतातूर आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गांभीर्य दाखवून तिचा तब्बल दोन वर्षांनी शोध लावला. त्या मुलीला एका वर्षाच्या बाळासह पोलिसांनी ताब्यात घेतले तर प्रियकराला अटक केली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या सकारात्मक भूमिकेमुळे वृद्ध आई-वडिलांना मुलगी परत मिळाली, त्यामुळे नागपूर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वसीम खान कय्युम खान असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

२ एप्रिल २०१९ रोजी आरोपी वसीम खानने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कळमना पोलिसांनी मुलगी आणि आरोपीचा शोध घेतला असता दोघेही मिळून आले नाही. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेच्या एएचटीयूकडे देण्यात आला.

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक रेखा संपकाळ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास केला. तपासात संशयित आरोपीच्या राहत्या ठिकाणी शोध घेतला असता दोघेही मिळून आले नाही. त्यानंतर मुलगी ही नंदसैनी, जि. कोसंबी (उत्तर प्रदेश) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे एक पथक कोसंबीला रवाना झाले.

पोलिसांनी वसीमच्या घरी त्याचा शोध घेतला असता मुलगी मिळाली. पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने वसीमसोबत लग्न केले असून एक वर्षाचा मुलगा असल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलासह तिला नागपूरला आणले. त्यानंतर वसीम यास मनीषनगर येथून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

0 Comments