दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता धनुष याने सोमवारी त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हे १८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी विभक्त झाली.
कलाविश्वातील अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांनी घटस्फोटाचं वृत्त सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो, अशी भावना ‘महाभारत’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केली.
नितीश यांचासुद्धा सप्टेंबर २०१९ मध्ये घटस्फोट झाला. १२ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी आयएएस अधिकारी असलेल्या पत्नीला घटस्फोट दिला. नितीश आणि स्मिता यांना जुळ्या मुली असून त्या आईसोबतच इंदूरमध्ये राहतात.
बाळ गर्भातच ओळखते आईचा आवाज, स्पर्श
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नितीश म्हणाले, “सप्टेंबर २०१९ मध्ये मी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आम्ही विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल मला सांगायचं नाहीये, पण घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मी इतकंच सांगू शकतो की घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायी असू शकतो.”
लग्नाबाबत ते पुढे म्हणाले, “मला लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण त्याबाबतीत मी कमनशिबी ठरलो. लग्न अयशस्वी ठरण्याची अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा ते तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे किंवा अहंकार आणि आत्मकेंद्रित विचारसरणीमुळे असू शकतं. पण कुटुंब तुटल्यावर सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना कमीत कमी नुकसान सहन करावं लागेल, याची खात्री करण्याची जबाबदारी पालकांवर आहे.”
0 Comments