✒️लेखक : प्रा.दत्ता जाधव
राजर्षी शाहू महाराज, म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे अशी अखंडित परंपरा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला लाभली आहे. या परंपरेने महाराष्ट्राचे शैक्षणिक भरण-पोषण करण्याचे महत्तम कार्य केले आहे. ही परंपरा शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि साळुंखे यांच्या स्मरणाशिवाय निस्तेज ठरेल! शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे हे श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे संकल्पक, संस्थापक व संवर्धक होत. मूळचे सातारा जिल्ह्यातील, पाटण तालुक्यातील रामापूर या गावचे साळुंखे कुटुंब शिक्षणासाठी मजल-दरमजल करत कोल्हापूर येथे स्थायिक झाले अन लोकराजा राजर्षी शाहूंच्या भूमीत श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणसेवेचे पवित्र व्रत हाती घेतले. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात शिक्षणप्रसारचे पवित्र कार्य आजही अविरतपणे, निःस्वार्थी वृत्तीने हे कुटुंब करत आहे. डॉ बापूजी साळुंखे व संस्थांमाता सुशिलादेवी साळुंखे या दांपत्यांच्या पोटी १७ जानेवारी,१९४६ रोजी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्म झाला. आज त्यांच्या जन्माला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून हा शब्द प्रपंच..!
प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणजे पैलवानी बाज असलेले एक पहाडी व्यक्तिमत्व होय. कारारीपणा, स्पष्टवक्तेपणा, गुणग्राहकता, शिस्त, बहुरंगी, बहुढंगी, हरहुन्नरी, विनोदी, मिश्किल असे अनेक विविध पैलू असणारे वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य अभयकुमार साळुंखे होय. प्राचार्य अभयकुमार यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाची जडण-घडण परम पूज्य बापूजी साळुंखे व संस्थांमाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या छत्र छायेखाली झाली. बापूजी शिस्तप्रिय होते.बालवयात बालहट्टने प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हातून काही चुका झाल्या. आपला मुलगा म्हणून बापूजीनी त्यांना माफ केले नाही. त्यांना शिक्षा केली. या अशा प्रकारच्या प्रसंगातूनच प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे शिस्तबद्ध असे व्यक्तिमत्त्व घडले.
बापूजी साळुंखे हे स्वातंत्र्य सेनानी होते. याचा प्रभाव प्राचार्य अभयकुमार यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पडला. पित्याप्रमाणे आपण ही देशसेवा केली पाहिजे या विचाराने प्राचार्य अभयकुमार यांनी सैन्यदलात सेवा करणेसाठी मनोदय व्यक्त केला व तो त्यांनी पूर्ण देखील केला. शिक्षणप्रसारचे कार्य ही देखील देशसेवाच आहे. त्यामुळे सैन्यदल सोडून प्राचार्य अभयकुमार यांना संस्थेच्या कार्यासाठी बापूजीनी परत आणले. बापूजी साळुंखे हे लोकशाहीवादी लोकशाहीचे नम्र उपासक होते. श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, लोकशाही मार्गाने चालावी हा बापूजींचा मनोदय होता. म्हणूनच प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना बापूजीनी संस्थेत प्रथमतः लेखनिक म्हणून नोकरी दिली. असे प्रसंग सार्वजनिक जीवनात क्वचित घडतात. पुढे सन१९७० साली प्राचार्य अभयकुमार साळुंखे मराठी विषयातून एम.ए. झाले. एम.ए. झाल्यानंतर देखील रितसर संस्था घटनेनुसार प्रथम अर्ज,मुलाखत ,निवड या क्रमाने त्यांची मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून संस्थेच्या अवर्षणग्रस्त जत या तालुक्याच्या ठिकाणी राजे रामराव महाविद्यालयात नेमणुक झाली. तद्नंतर मिरज, विवेकानंद महाविद्यालय-कोल्हापूर, उस्मानाबाद या संस्थेच्या संस्कार केंद्रावर प्राचार्य अभयकुमार यांनी मराठी चे व्यासंगी प्राध्यापक म्हणून निष्ठेने कार्य केले. संस्थाचालकांचा मुलगा म्हणून ही संस्थेच्या-'बदली' हा नियम त्यांनी कधीच डावलला नाही. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना संस्थेत प्राचार्य झालेले बापूजीना पहायचे होते. तशी इच्छा बापूजीनी संस्थेच्या पदाधिकारी कडे बोलूनही दाखवली. पण दोन वेळा प्राचार्य पदाची संधी आली असताना प्राचार्य अभयकुमार यांना डावलण्यात आले. पुढे ते काकासाहेब चव्हाण महाविद्यालय,तळमावले चे प्राचार्य झाले. सन १९७८ ते १९८५ अशी सात वर्षे ते तिथे प्राचार्य होते. प्राचार्य म्हणून त्यांनी गौरवास्पद असे कार्य केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार व कष्टाळू आहे पण त्याला इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड आहे, ही बाब प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना जाणवली तेंव्हा त्यांनी तळमावले येथे इंग्रजी विभाग स्थापन करून तिथे एका कुशल इंग्रजी च्या गुरुदेव कार्यकर्त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. या प्रसंगातून त्यांच्या ठायी असणारा 'बापूजींचा ध्येयवाद' प्रतीत होतो. प्राचार्य झाल्यानंतर त्यांनी कोणावरही आकस धरला नाही. उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक प्राप्त केला. आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली सलग १५ वर्षे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर शिक्षक आमदार म्हणून संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्याला निवडून आणण्यात कार्याध्यक्ष म्हणून प्राचार्य अभयकुमार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. अनेक प्राचार्य त्यांनी घडवले म्हणून ते 'प्रचार्यांचे प्राचार्य' आहेत.
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे व्यक्तिमत्व वरून काटेरी व आतून रसाळ गऱ्या सारखे आहे. संस्थेतल्या प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याला प्राचार्य अभयकुमार हे आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हा आपलेपणा त्यांनी त्यांच्या स्वभावाने प्राप्त केला आहे. मध्यंतरीच्या काळात संस्था अनेक अडचणीतून उभी करण्याचे सर्व श्रेय हे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे आहे. महाभारताचे युद्ध झालेनंतर सर्वत्र शांतता पसरली होती म्हणून त्या कलखंडास शांतीपर्व म्हणतात. या शांती पर्वात पितामह भीष्मांनी युधिष्ठिर ला राज्य कसे चालवावे याचे मार्गदर्शन केले. अगदी त्याचप्रमाणे बापूजीनी शेवटच्या टप्प्यात प्राचार्य अभयकुमार यांना संस्था कशी चालवावी याचे मार्गदर्शन केले. आज प्राचार्य अभयकुमार साळुंखे बापूजीनी दाखवलेल्या वाटेवरूनच मार्गक्रमण करत आहेत. ज्या ज्या वेळी राष्ट्र व समाज संकटात असेल त्या त्या वेळी कर्तव्य भावनेने आपण राष्ट्र व समाजाच्या मदतीसाठी पुढे सरसावलो पाहिजे अशी बापूजींची शिकवण होती. आपल्या जबाबदारी चे भान करून देते ते शिक्षण. अशी बापूजींची शिक्षणाची व्याख्या होती. राष्ट्रभक्ती हा त्यांच्या सेवाव्रताचा आत्मा होता. भारत-बांगलादेश युद्धात बापूजीनी संस्थेच्या माध्यमातून २ लाख रुपयांचा चेक तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या कडे सुपूर्द केला. हा सेवाव्रताचा वारसा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी पुढे चालवला. मागील दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेंव्हा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र् सरकारला दुष्काळ निधी म्हणून ५२ लाख, २६ हजार, ११३ रुपयांचा चेक दिला. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे बापूजींच्या कसोटीस उतरले व त्यात त्यांनी स्वतःला सिद्ध ही केले. बापूजींच्या पश्चात संस्था वाढीसाठी ते आज वयाची पंचाहत्तरी पार होऊन ही पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये अविश्रांत पणे भ्रमंती करतात, ह्या पवित्र पायांना अजून बळ मिळो. साहेबांची शंभरी ही साजरी करण्याचे भाग्य आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना लाभो...!
'देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहाळे
मांगल्यानी गंधलेले
सुंदराचे सोहळे....!
- प्रा. दत्ता जाधव
लेखक विवेकानंद महाविद्यालया चे माजी विद्यार्थी आणि सद्या संस्थेच्या आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
0 Comments