आर आर पाटलांच्या मुलाला राष्ट्रवादीत मोठं पद?


 
नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत राष्ट्वादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी आपली छाप सोडली आहे. रोहित पाटील  यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे.

एकीकडे शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, एकनाथ खडसेंसारख्या नेत्यांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलं असताना रोहित पाटील यांना मात्र सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं.

त्यांच्या याच यशामुळे त्यांना लवकरच राष्ट्रवादी पक्षात मोठं पद मिळेल असं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंबंधी सूचक विधान केलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला आज जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.

“सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या पक्षात नेहमी होते, त्यामुळे काही अडचण नाही. शेवटी पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केलं पाहिजे हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे,” असे सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांचं नाव न घेता केलं.

गोव्यामध्ये काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता. शिवसेना, राष्ट्रवादी त्याठिकाणी एकत्रित आहे. त्यांना मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले.

Post a Comment

0 Comments