बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; आबांचं स्वप्न पूर्ण


 
कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता मिळवली. कवठे महांकाळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा आणि शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आरआर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी म्हटलं की, प्रचारावेळी विरोधकांनी वडील हा शब्द वापरण्याऐवजी बाप शब्द वापरला.

त्यांचाच धागा पकडून मी विरोधकांना बाप आठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. मला आज आबांची आठवण येतेय. कवठे महाकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आज राष्ट्रवादीला बहुमत मिळालं, आबांचं स्वप्न पूर्ण झालं असं रोहित पाटील म्हणाले.

कवठे महाकाळ शहरात निवडणूक लढवत असताना शहर कसं असायला हवं, पुढच्या २५ ते ३० वर्षांच्या काळात शहर कसं हवं याचं व्हिजन लोकांसमोर ठेवलं, त्यामुळे लोकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.



आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल अशा भावना रोहित पाटील यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली , सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण जो विश्वास दाखवला त्याबद्दल रोहित पाटील यांनी आभारही मानले.
 
तसंच निवडणुकीत काही प्रसंग असे होते की, अचारसंहितेची वेळ असताना, माझ्यासह उमेदवारांना धक्काबुक्की झाली. मात्र जिथं घटना घडली तिथेही आम्ही निवडून आलो. तिथे सर्वसामान्यांच्या हिताचं काय ते डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आजही ७५ वर्षांनंतर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. निवडणूक संपण्याआधीच प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तयारी सुरु केली होती असं सांगत लवकरच कामे पूर्ण करून लोकांचा विश्वास सार्थ ठरवू असं त्यांनी म्हटलं.

Post a Comment

0 Comments