क्रूरतेचा कळस: प्रेमविवाहानंतर पत्नीची हुंड्यासाठी हत्या; शीर धडावेगळं केलं आणि…


 
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे २४ वर्षीय विवाहितेच्या अपहरणाबाबत  तक्रार आल्यानंतर त्याचा तपास करत असताना धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या महिलेचे अपहरण झाले नव्हते तर तिची पतीनेच हत्या केली होती व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने व सासरच्या मंडळीनी अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू आणि सासरा अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून ज्या प्रकारे विवाहितेची हत्या करण्यात आली ते पाहून सगळेच सून्न झाले आहेत. मृत महिलेचे नाव रिया जैन असून तिचा पती आकाश त्यागी, त्याची आई उषा आणि वडील सुरेश त्यागी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सिद्धार्थ विहार भागात राहणाऱ्या आकाशचे रियावर प्रेम होते. १० महिन्यांपूर्वीच कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावून दिले. लग्नाला काही दिवस झाल्यानंतर आकाश आणि त्याच्या घरच्यांकडून रियाकडे हुंड्याची मागणी होऊ लागली. त्यासाठी तिचा छळ सुरू करण्यात आला. हुंड्याबाबत माहेरी सांगण्यास नकार दिल्याने रियाचा छळ आणखीच वाढला आणि त्यातून तिची हत्या करण्यापर्यंत आकाशची मजल गेली.


आकाशने घरातच रियाची हत्या केली. त्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या समोरच त्याने मृतदेहाचे तुकडे केले. शीर धडावेगळे करत ते नदीत फेकण्यात आले तर धड मुरादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलात फेकण्यात आले. हे अमानुष कृत्य केल्यानंतर पतीने आणि सासरच्यांनी अपहरणाचा बनाव रचला व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

आकाशने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करून पत्नी रियाचे अपहरण झाल्याचे सांगितले. रियाच्या भावाने कुणाकडून तरी कर्जाऊ रक्कम घेतली आहे आणि त्याच्या वसुलीसाठी काही गुंडांनी रियाचे घरातून अपहरण केले आहे, असेही आकाश पोलिसांना म्हणाला. त्यानंतर पोलीस तातडीने आकाशच्या घरी पोहचले.

त्यावेळी घरात चौकशी करत असतानाच काही खटकणाऱ्या गोष्टी आढळून आल्याने पोलिसांना वेगळाच संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आकाश आणि त्याच्या आईवडिलांची कसून चौकशी केली. त्या चौकशीतूनच सत्य समोर आलं. कट रचून रियाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे असून रियाचा मोबाइल आणि आरोपीची स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे. धड पोलिसांच्या हाती लागले असले तरी अजून शीर आढळलेले नाही. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments